कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात मधल्या फळीतील फलंदाजांनी केलेल्या सुमार कामगिरीमुळे संघाला पराभव पत्करावा लागला, असे स्पष्टीकरण देतानाच चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने केदार जाधवची पाठराखण केली.

बुधवारी झालेल्या या लढतीत चेन्नईला १० धावांनी पराभूत व्हावे लागले. सहाव्या क्रमांकावर आलेल्या जाधवने १२ चेंडूंत अवघ्या सात धावा केल्यामुळे समाजमाध्यमांवर त्यालाच पराभवासाठी जबाबदार धरण्यात आले. ‘‘केदारसाठी बुधवारचा दिवस प्रतिकूल होता. परंतु त्याने यापूर्वी चेन्नईसाठी अनेक वेळा महत्त्वपूर्ण खेळी साकारली आहे. सामन्याच्या परिस्थितीनुसार उजव्या-डाव्या फलंदाजाची जोडी कायम ठेवायची असल्याने जाधवला रवींद्र जडेजाच्या आधी बढती देण्यात आली,’’ असे धोनीने सांगितले.