Rinku Sing Struggle : रिंकू सिंग हे नाव सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आलं आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे त्याने केलेली झंझावाती खेळी. पाच षटकार आणि एका चौकारासह २१ चेंडूंमध्ये ४८ धावा करणाऱ्या रिंकूचं आयुष्य संघर्षानी भरलेलं आहे. त्याचा इथवर येण्याचा प्रवास सोपा नाही. एक काळ असाही होता की रिंकू सिंग क्रिकेट खेळण्यासाठी वडिलांचा मार खायचा. पण त्याचा धीर खचला नाही, तो हिंमत हरला नाही. तो क्रिकेट खेळत राहिला आणि त्याने अखेर यशाला गवसणी घातली आहे. त्याचं कौतुक दस्तुरखुद्द शाहरुख खाननेही केलं आहे. त्याचा इथवरचा संघर्षमयी प्रवास आपल्या डोळ्यात पाणी आणेल यात शंकाच नाही.
कोण आहे रिंकू सिंग?
१२ ऑक्टोबर १९९७ ला रिंकूचा जन्म उत्तर प्रदेशातल्या अलीगढमध्ये झाला. रिंकू लेफ्टी बॅट्समन आणि राइट हँड ऑफ ब्रेक बॉलर आहे. रिंकूचं कुटुंब अत्यंत गरीब. त्याचे वडील खानचंद्र सिंग हे घरोघरी गॅस सिलिंडर पोहचवण्याचं काम करतात. तर त्याचा भाऊ रिक्षा चालवतो. रिंकूची आई घरकाम करते. अत्यंत संघर्षात आणि गरीबीत रिंकूचं बालपण गेलं आहे.
क्रिकेट खेळण्यासाठी रिंकू खायचा वडिलांचा मार
रिंकू अभ्यासात फारसा चांगला नव्हता. पण त्याचं वेड होतं क्रिकेट. तो इतकं क्रिकेट खेळायचा की वडिलांकडून त्याने अनेकदा क्रिकेट खेळण्यासाठी मारही खाल्ला आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रिंकूनेच ही बाब स्पष्ट केली. क्रिकेट खेळून जेव्हा रिंकूने बाईक जिंकली तेव्हा त्याला वडिलांकडून पडणारा मार बंद झाला. या बाईकवरून रिंकूचे वडील सिलिंडर पोहचवू लागले. रिंकूला पाच भावंडं आहे. तिसऱ्या क्रमांकावर रिंकू आहे. घरची परस्थिती बेताची होती. पण त्याच्या डोळ्यात क्रिकेटर होण्याचं स्वप्न होतं. यासाठी त्याने प्रसंगी झाडू मारण्याचंही काम केलं आहे.
आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे रिंकूची क्रिकेटर बनण्याची स्वप्नं धुळीस मिळू लागले होती. आयपीएलमध्ये निवड झाल्याने चित्र बदललं. रिंकू KKR साठी केलेल्या खेळीमुळे हिरो झाला आहे. त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.
कोलकाता आणि गुजरात सामन्यात काय झालं?
कोलकाता नाईट रायडर्सकडून रिंकू खेळतो आहे. गुजरात विरूद्ध कोलकाता अशी मॅच रविवारी रंगली होती. या सामन्यात गुजरातने टॉस जिंकला आणि कोलकात्यासमोर विजयासाठी २०५ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. हे लक्ष्य कोलकाता गाठू शकणार नाही असं वाटलं होतं. पण त्याचवेळी केकेआर टीमचा संकटमोचक म्हणून रिंकू सिंग आला आणि त्याने पाच षटकार, एक चौकार यांच्यासह ४८ धावांची झंझावाती खेळी करत कोलकाताच्या हातातून निसटलेली मॅच अक्षरशः खेचून आणली.
रिंकूचं क्रिकेट करिअर
५ मार्च २०१४ ला वयाच्या १६ व्या वर्षी रिंकूने उत्तर प्रदेशसाठी लिस्ट ए क्रिकेटमध्ये भाग घेतला होता. या मॅचमध्ये त्याने ८७ चेंडूंमध्ये ८३ धावा केल्या होत्या. त्यानंतर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी मध्ये त्याला T20 मध्ये खेळण्याची संधी मिळाली. विदर्भाच्या विरोधात त्याने पाच चेंडूंमध्ये २४ धावा केल्या होत्या. त्यानंतर अंडर १६, अंडर १९ आणि अंडर २३ क्रिकेट स्पर्धांमध्ये तो उत्तर प्रदेशातून खेळला आहे. २०१६-१७ मध्ये रणजी ट्रॉफी उत्तर प्रदेशही तो खेळला होता.