KKR vs CSK Match Updates: आयपीएल २०२३ मधील ६१ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळला जात आहे. या सामन्यात सीएसकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना सीएसकेने शिवम दुबे आणि रवींद्र जडेजाच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर २० षटकांत ६ बाद १४४ धावा केल्या. त्याचबरोबर कोलकाता नाईट रायडर्सला १४५ धावांचे लक्ष्य दिले आहे.

चेन्नईची पॉवरप्लेमध्ये शानदार सुरुवात –

नाणेफेक जिंकल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जच्या डावाची सुरुवात करण्यासाठी डेव्हॉन कॉनवे ऋतुराज गायकवाडसह मैदानात उतरला. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ३१ धावांची भागीदारी झाली. चेन्नई सुपर किंग्जला पहिला धक्का ऋतुराज गायकवाडच्या रूपाने बसला, जो १३ चेंडूत १७ धावांची खेळी केल्यानंतर वरुण चक्रवर्तीचा बळी ठरला. सीएसकेसाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अजिंक्य रहाणेने कॉनवेसह धावांचा वेग कमी होऊ दिला नाही. दोघांनी मिळून संघाची धावसंख्या पहिल्या ६ षटकात १ गडी गमावून ५२ धावांपर्यंत नेली.

चेन्नईने चांगली सुरुवात केल्यानंतर झटपट विकेट गमावल्या –

सुरुवातीची ६ षटके संपल्यानंतर या सामन्यात सीएसकेचा डाव मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना दिसत होता. दरम्यान, ६१ धावांवर संघाला दुसरा धक्का अजिंक्य रहाणेच्या रूपाने बसला, जो ११ चेंडूत १६ धावांची खेळी केल्यानंतर वरुण चक्रवर्तीचा बळी ठरला. ६६ धावांवर, ३० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतलेल्या डेव्हॉन कॉनवेच्या रूपात सीएसकेने तिसरी विकेट गमावली. ७२ धावांपर्यंत चेन्नईचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता.

हेही वाचा – RCB vs RR: “… तर सामना नक्कीच शेवटच्या”; आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर संजू सॅमसननी प्रतिक्रिया

शिवम दुबे आणि रवींद्र जडेजाच्या भागीदारीने चेन्नईचा डाव सावरला –

चेन्नई सुपर किंग्जचा अर्धा संघ ७२ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा यांनी संघाचा डाव सांभाळला. या दोघांनी मिळून १५ षटक संपल्यानंतर धावसंख्या ९२ धावांपर्यंत नेली. १७ षटकांच्या अखेरीस दुबे आणि जडेजाने मिळून चेन्नईची धावसंख्या ११५ धावांपर्यंत पोहोचवली. सीएसकेने २० षटक संपल्यानंतर ६ गडी गमावून १४४ धावा केल्या.

शिवम दुबेने नाबाद ४८ तर रवींद्र जडेजाने २० धावा केल्या. दोघांमध्ये सहाव्या विकेटसाठी ६८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी पाहायला मिळाली. केकेआरकडून गोलंदाजीत सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती यांनी २-२ तर शार्दुल ठाकूर आणि वैभव अरोरा यांनी १-१ बळी घेतला.