Suryakumar Yadav Praised Jitesh Sharma: आयपीएल २०२५ स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये पार पडला. लखनऊचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी हा सामना अतिशय महत्वाचा होता. कारण हा सामना जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडे गुणतालिकेत टॉप २ मध्ये प्रवेश करण्याची संधी होती. मात्र, या सामन्यात ऋषभ पंतने दमदार शतकी खेळी केली. या खेळीच्या बळावर लखनऊ सुपर जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर २२८ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून कर्णधार जितेश शर्माने शानदार खेळी करून संघाला विजय मिळवून दिला.
हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी क्वालिफायर १ मध्ये प्रवेश करण्यासाठी अतिशय महत्वाचा होता. हा सामना जर गमावला असता, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला एलिमिनेटरचा सामना खेळावा लागला असता. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने नाणेफेक जिंकून लखनऊला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. लखनऊकडून सलामीला आलेल्या मिचेल मार्शने ६७ धावांची खेळी केली. तर कर्णधार ऋषभ पंतने ६१ चेंडूंचा सामना करत नाबाद ११८ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ११ चौकार आणि ८ षटकार मारले. या खेळीच्या बळावर त्याने आपल्या संघाची धावसंख्या २२७ धावांवर पोहोचवली.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला हा सामना जिंकण्यासाठी २२८ धावा करायच्या होत्या. या संघाला गेल्या १८ वर्षांत इतक्या मोठ्या धावांचा यशस्वी पाठलाग करता आलेला नव्हता. त्यामुळे जर सामना जिंकायचा असेल,तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला इतिहास घडवायचा होता. या धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीला आलेल्या फिल सॉल्टने ३० तर विराट कोहलीने ५४ धावांची खेळी केली. हे दोघे जोपर्यंत खेळत होते तोपर्यंत वाटत होतं की, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ हा सामना एकहाती जिंकणार. मात्र, दोघांची विकेट गेल्यानंतर पारडं लखनऊच्या बाजूने झुकलं. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार जितेश शर्मा लखनऊच्या गोलंदाजांसाठी सरप्राईज पॅकेज ठरला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जितेश शर्माला फिनिशर म्हणून संघात स्थान दिलं होतं. त्याने ही जबाबदारी मोक्याच्या क्षणी पार पाडली. त्याने या डावात फलंदाजी करताना ३३ चेंडूत ८ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने नाबाद ८५ धावांची खेळी केली. त्याला साथ देत मयांक अगरवालने नाबाद ४१ धावांची खेळी केली. दोघांनी मिळून आपल्या संघाला ८ चेंडू शिल्लक असताना विजय मिळवून दिला. जितेश शर्माच्या या खेळीनंतर भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून खास स्टोरी शेअर केली आहे.
त्याने जितेश शर्माचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देत त्याने, “चांगल्या लोकांसोबत नेहमी चांगलंच होतं”, असं लिहिलं आहे. जितेश शर्माच्या या शानदार खेळीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएल २०२५ स्पर्धेतील क्वालिफायर १ मध्ये प्रवेश केला आहे. या संघाचा सामना अव्वल स्थानी असलेल्या पंजाब किंग्ज संघाविरूद्ध होणार आहे.