Punjab Kings vs Lucknow Super Giants IPL Match Updates : आयपीएलच्या १६ व्या हंगामातील ३८ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात मोहालीच्या बिंद्रा स्टेडियमवर रंगला. पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या लखनऊच्या फलंदाजांनी पंजाबच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. केली मायर्स, मार्कल स्टॉयनिस यांच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर लखनऊने २० षटकात ५ विकेट्स गमावत २५७ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर २५८ धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या पंजाब किंग्जच्या फलंदाजांची लखनऊच्या गोलंदाजांनी दमछाक केली. लखनऊचा गोलंदाज यश ठाकूरने चार विकेट्स घेतल्या. त्यामुळे पंजाब किंग्जचा आख्खा संघ १९.५ षटकात २०१ धावांवर गारद झाला. लखनऊने पंजाबवर दणदणीत विजय मिळवून गुणतालिकेत वरचा टप्पा गाठला आहे.

पंजाब किंग्जसाठी सलामीला उतरलेल्या कर्णधार शिखर धवनला स्वस्तात माघारी जावं लागलं. मार्कस स्टॉयनिसने शिखर धवनला झेलबाद केलं. धवन फक्त एक धाव करून तंबूत परतला. त्यानंतर प्रभसिमरन सिंगला लखनऊचा गोलंदाज नवीन उल हकने ९ धावांवर बाद केलं. त्यानंतर अर्थल तायडेनं चौफेर फटकेबाजी करत लखनऊच्या गोलंदाजांच्या नाकीनऊ आणलं. परंतु, तायडे ६६ धावांवर असताना रवी बिष्णोईनं त्याला झेलबाद केलं आणि पंजाबला मोठा धक्का बसला. त्यानंतर सिकंदर रजा यश ठाकूरच्या गोलंदाजीवर ३६ धावांवर असताना बाद झाला. त्यानंतर रवी बिष्णोईने लियाम लिविंगस्टोनला २३ धावांवर बाद केलं. नवीन उल हकने सॅम करनला २१ धावांवर बाद केलं. त्यानंतर रबाडाला बाद करून नवीनने तीन विकेट्स घेण्याची कामगिरी केली. यश ठाकूरनेही चार विकेट्स घेतल्या.

नक्की वाचा – ३६ सामन्यांमध्ये ‘असा’ शॉट पाहिला नसेल; यशस्वी जैस्वालच्या गगनचुंबी षटकाराची का होतेय चर्चा? Video एकदा पाहाच

पंजाब किंग्जसाठी कगिसो रबाडाने अप्रतिम गोलंदाजी केली. सुरुवातीच्या षटकांमध्येच राहुलला बाद करत पहिली विकेट घेतली. त्यानंतर आक्रमक फलंदाजी करणाऱ्या केली मायर्सला रबाडाने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मात्र, आयुष बदोनी आणि मार्कस स्टॉयनिसने अप्रतिम फलंदाजी करत धावांचा आलेख चढता ठेवला. पण लियाम लिविंगस्टोनच्या गोलंदाजीवर बदोनी ३७ धावांवर झेलबाद झाला आणि पंजाबला ब्रेक थ्रू मिळाला. त्यानंतर निकोलस पूरन आणि स्टॉयनिसने पुन्हा एकदा गोलंदाजांना समाचार घेत धावसंख्या वाढवली.

पंजाबसाठी कगिसो रबाडाने दोन विकेट्स घेतल्या. लियाम लिंविंगस्टोनला एका विकेटवर समाधान मानावं लागलं. लखनऊसाठी के एल राहुलने ९ चेंडूत १२ धावा केल्या. केली मायर्सने २४ चेंडूत ७ चौकार आणि ४ चौकार ठोकून ५४ धावांची खेळी केली. आयुष बदोनीनं २४ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकार मारत ४३ धावा केल्या. मार्कस स्टॉयनिसने ४० चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकार ठोकून ७२ धावा कुटल्या. सॅम करनने स्टॉयनिसला बाद करत एक विकेट घेतली. निकोलस पुरनने १९ चेंडूत ४५ धावांची खेळी केली.