Mitchell Marsh Century: आयपीएल स्पर्धेचे हे १८ वे हंगाम आहे. या काळात अनेक दिग्गज खेळाडू होऊन गेले. एका घरातले सख्खे भाऊ देखील या स्पर्धेत खेळताना दिसून आले. ज्यात युसुफ पठाण – इरफान पठाण, माईक हसी– डेव्हिड हसी आणि शॉन मार्श –मिचेल मार्श या जोडीचा समावेश आहे. मात्र, आतापर्यंत जे कोणालाच जमलं नव्हतं, ते शॉन मार्श – मिचेल मार्शच्या जोडीने करून दाखवलं आहे.

गुरूवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात लखनऊकडून सलामीला आलेल्या मिचेल मार्शने गुजरातच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आणि शतक पूर्ण केलं. या शतकी खेळीसह मिचेल मार्शच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

याआधी २००८ मध्ये मिचेल मार्शचा भाऊ शॉन मार्शने २००८ मध्ये पंजाबकडून खेळताना शतक पूर्ण केलं होतं. यासह मार्श भावांची जोडी या स्पर्धेतील अशी पहिलीच जोडी ठरली आहे ज्यांनी आयपीएल स्पर्धेत शतक झळकावलं आहे. याआधी कधीच असं घडलं नव्हतं. शॉन मार्शने २००८ मध्ये आयपीएल स्पर्धेत पदार्पण केलं होतं. पंजाब किंग्जकडून खेळताना त्याने ११५ धावांची खेळी केली होती. डावखुऱ्या हाताचा शॉन मार्श आपल्या स्टायलिश शॉट्ससाठी प्रसिद्ध होता. पंजाबकडून खेळताना त्याने ऑरेंज कॅपही पटकावली होती.

तर मिचेल मार्श बद्दल बोलायचं झालं तर, या हंगामात तो लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून खेळतोय. अष्टपैलू खेळाडू असणारा मिचेल मार्श या हंगामात स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून खेळतोय. लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून त्याला सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळाली आहे. या संधीचा त्याने पुरेपूर फायदा घेतला. सलामीला फलंदाजी करताना त्याने लखनऊला दमदार सुरूवात करून दिली आहे.

आयपीएल २०२५ स्पर्धेत शतक झळकावणारा पहिलाच परदेशी फलंदाज

गुजरात टायटन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात मिचेल मार्शने ११७ धावांची खेळी केली. यासह तो आयपीएल २०२५ स्पर्धेत शतक झळकावणारा पहिलाच परदेशी फलंदाज ठरला. या हंगामात आतापर्यंत ६ फलंदाजांनी शतकं झळकावली आहेत. उर्वरित ६ शतकं ही भारतीय फलंदाजांनी झळकावली आहेत. तर मिचेल मार्श हा या हंगामात शतक झळकावणारा पहिलाच परदेशी खेळाडू ठरला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.