आयपीएलच्या पंधराव्या हंगामात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा पहिल्याच सामन्यात पराभव झाला. पहिल्या सामन्यामध्ये दणदणीत विजय मिळवून विजयी सुरुवात करण्याचा चेन्नईचा प्रयत्न होता. मात्र त्याला यश मिळू शकले नाही. दरम्यान चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली आता संघात सामील झाला आहे. तीन दिवसांच्या विलगीकरणाचा काळ पूर्ण करुन तो संघात सामील झाला आहे. त्याचे चेन्नईच्या खेळाडूंनी उत्साहाने स्वागत केलंय. या स्वागताचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
व्हिसा न मिळाल्यामुळे येण्यास उशीर
मोईन अली परदेशात असल्यामुळे त्याला भारतात येण्यासाठी लवकर व्हिसा मिळाला नव्हता. त्यामुळे मोईन चेन्नईच्या पहिल्या सामन्यात खेळू शकला नाही. मोईन अष्टपैलू खेळाडू असल्यामुळे त्याच्या नसण्याचा फटका चेन्नईला पहिल्याच सामन्यात बसला. चेन्नई संघ पहिल्या सामन्यात केकेआरविरोधात खेळत असतान पराभूत झाला. दरम्यान परदेशातून परतल्यानंतर नियमानुसार तीन दिवस अलगीकरणात राहणे बंधनकारक आहे. मोईनने हा कालवधी पूर्ण केलाय. त्यानंतर तो लगेच संघात सामील झालाय. त्याच्या या येण्याचे चेन्नईच्या खेळाडूंनी जंगी स्वागत केले आहे.
चेन्नईने केले जंगी स्वागत
मोईन अली आल्यांतर चेन्नई सुपर किंग्जने त्याचे जंगी स्वागत केले. त्याच्या स्वागताचा एक व्हिडीओ चेन्नईने सोशल मीडियावर अपलेड केला आहे. या व्हिडीओमध्ये तो इतर खेळाडूंशी बोलताना दिसतोय. तो प्रत्येक खेळाडूची भेट घेत होता. माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनेही अलीचे स्वागत केले आहे. धोनीने अलीचा हात हातात घेत त्याला संघात आल्याबद्दल अभिनंदन व्यक्त कले आहे. तसेच अली इतरही खेळाडूंच्या भेटी घेताना दिसतोय. अलीच्या येण्याने चेन्नईचे बळ वाढणर आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चेन्नईची ताकत वाढणार आहे. चेन्नई आपला दुसरा सामना ३१ मार्च रोजी लखनऊ सुपर जायंट्सविरोधात मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळणार आहे.