भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे आयपीएल २०२५ ला एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आले होते. या स्थगितीनंतर आयपीएल २०२५ ला १७ मे पासून सुरूवात झाली आहे. पण आयपीएलमध्ये सहभागी झालेले सर्वच खेळाडू पुन्हा खेळण्यासाठी भारतात परतले नाहीत. यामध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघातील एक खेळाडूही मैदानात परतला नाही. पण त्याने आयपीएलच्या स्थगितीदरम्यानचा प्रसंग सांगितला आहे की, जेव्हा दोन्ही देशांकडून मिसाईल्स डागली जात होती; तेव्हा त्याचे आई-वडिल पाकव्याप्त काश्मीरमध्ये होते.
कोलकाता नाईट रायडर्स संघाचा अष्टपैलू मोईन अली हा अशा काही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंपैकी एक आहे जो आयपीएल २०२५ पुन्हा सुरू झाल्यावर खेळण्यासाठी भारतात परतला नाही. मोईनने सांगितले की, आयपीएल २०२५ थांबण्यापूर्वीच तो भारताबाहेर गेला होता. जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण स्थिती होती, तेव्हा त्याचे आई-वडिल पाकव्याप्त काश्मीरमध्ये होते, तर त्याची पत्नी तो आणि मुलं भारतात होते.
मूळचा पाकिस्तानचा असलेला मोईन अली हा इंग्लंडकडून क्रिकेट खेळतो. मोईन अली बियर्ड बिफोर विकेट पॉडकास्टमध्ये भारत-पाक स्थितीबद्दल बोलताना म्हणाला, “माझे आई-वडिल त्यावेळी काश्मीरमध्ये पाकिस्तानमध्ये (POK) होते. कदाचित जिथे हल्ले झाले तिथून फक्त एक तासाच्या अंतरावर होते. त्यामुळे परिस्थिती थोडी चिंताजनक होती. त्या दिवशी त्यांना कशीतरी एकमेव फ्लाईट मिळाली. ते तिथून बाहेर पडले याचा मला आनंद आहे, पण ती परिस्थिती भयंकर होती.”
मोईन अली पुढे म्हणाला, “लोकांना काय चाललंय आणि नेमकी परिस्थिती कशी आहे हे पूर्णपणे कळत नव्हतं. मी बऱ्याच लोकांशी बोललो. काही लोक म्हणत होते की ‘युद्ध होणार नाही, सर्व काही ठीक होईल. अशा गोष्टी यापूर्वीही घडल्या आहेत’. काही लोक म्हणत होते की, ‘मला वाटतं की युद्ध होईल, मला वाटतं की बदला घेतला जाईल किंवा तुम्ही त्याला जे काही म्हणू इच्छिता ते होईल’. सगळीकडे खोट्या बातम्या पसरत होत्या, विशेषतः वृत्तसंस्थांवर आणि पत्रकारांवर विश्वास ठेवणं कठीण होतं.”
पुढे मोईन अली म्हणाला, “तुम्हाला नेमकं काय चाललंय हे माहित नाही. त्यामुळे स्थिती प्रचंड भयानक होतं, कारण तुम्ही नेमकं कुठे आहात, काय चाललंय, सगळं कधी सुरळीत होईल याबद्दल काहीच कल्पना नव्हती. आम्हाला ज्या गोष्टीची चिंता होती ती म्हणजे विमाने रद्द होतील आणि आम्ही बाहेर पडू शकणार नाही. पण स्थानिक खेळाडू किंवा तिथे अडकलेल्या पाकिस्तानी किंवा भारतीय खेळाडूंना काय होणार आहे हे माहित नव्हतं जी अधिक कठीण परिस्थिती होती.:
आयपीएल एक आठवडा पुढे ढकलण्यापूर्वीच पाकिस्तानी वंशाच्या मोईन अलीने भारत सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. तो म्हणाला, “पंजाब-दिल्ली सामना रद्द होण्याच्या आदल्या रात्री मी भारत सोडण्याचा निर्णय या कारणामुळेच केला. मी अशा लोकांपैकी एक आहे ज्यामध्ये आपण आयपीएल खेळत आहोत की पीएसएल खेळत आहोत याची पर्वा नाही. सर्वात महत्त्वाचं काय आहे तर सुरक्षित राहणं किंवा मग जितकं शक्य आहे तितकं सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करणं.”
मोईन पुढे म्हणाला, “माझ्या बोलण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही जगात कुठेही सुरक्षित नाही आहात. पण तुमच्या कुटुंबाला आणि मुलांना शक्य तितकं सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न आपण करत असतो. खरं सांगायचे तर, स्पर्धा पुढे ढकलण्यापूर्वी मी स्पर्धेतून बाहेर पडलो होतो. प्रामाणिकपणे सांगू तर मला बरं वाटतं नव्हतं. त्यावेळी मी खूप आजारी होतो. मला वायरल किंवा काहीतरी त्रास होत होता.”