आयपीएल २०२२ चा हंगाम आठवड्यावर येऊन ठेपलाय. येत्या २६ मार्च रोजी या हंगामाची सुरुवात होणार असून महेंद्रसिंग धोनी कर्णधार असलेला चेन्नई सुपर किंग्स आणि श्रेयस अय्यर कर्णधार असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघात सामना रंगणार आहे. त्या दृष्टीने तयारीदेखील करण्यात आली असून दोन्ही संघानी सराव सुरु केला आहे. मात्र चेन्नईने तब्बल ८ कोटी रुपयांना घेतलेला मूळचा इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडून मोईन अली अजूनही भारतात आलेला नाही. त्याला अजूनही भारताचा व्हिजा मिळालेला नसल्यामुळे तो भारतात येऊ शकत नाहीये. मोईन अलीसारखा खेळाडूच्या उपस्थितीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे सीएसके संघाचे व्यवस्थापन चिंतेत आहे.

चेन्नई सुपर किंग्जमधील सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि गोलंदाज दीपक चहर या दोन खेळाडूंचे स्वास्थ ठीक नसल्यामुळे ते सामने खेळणार का ? असा प्रश्न एकीकडे निर्माण झालेला आहे. तर दुसरीकडे व्हिजासंदर्भात अडचणी येत असल्यामुळे मोईन अली अद्याप भारतात आलेला नाही. त्यामुळे ऋतुराज, दीपक खेळण्यासाठी फीट नसताना आता मोईन आलीच्या उपस्थितीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जगभरातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे मोईनला व्हिजा मिळताना अडचणी येत आहेत.

एकीकडे संघ व्यवस्थापन चिंतेत असले तरी लवकरच मोईनचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा होईल. त्याला लवकरच व्हिजा मिळेल अशी आशा चेन्नई सुपर किंग संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी व्यक्त केलीय. “मोईन अलीने मागिल महिन्यात २८ फेब्रुवारी रोजीच व्हिजासाठी रितसर अर्ज केला आहे. मात्र २० दिवस उलटून गेले असून अद्याप त्याला व्हिजा मिळालेला नाही. तो यापूर्वी अनेक वेळा भारतात आलेला आहे, तरीदेखील त्याला भारतात येण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे मिळत नाहीयेत. तो लवकरच टीममध्ये सामील होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. व्हिजा मिळताच भारतात येणार असल्याचे मोईनने आम्हाला सांगितले आहे,” असे विश्वनाथन यांनी सांगितले आहे.

दरम्यान, मागील एका महिन्यापासून चेन्नई सुपर किंग्जचा संघ सुरतमध्ये सराव करतोय. आयपीएल सीझन २०२२ च्या पहिल्याच दिवशी हा संघ कोलकाता नाईट रायडर्सची दोन हात करेल. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे.