मुंबईविरूद्ध सलामीच्या सामन्यात चेन्नईने ५ गडी राखून विजय मिळवला. २०१८पासून सलग पाच वेळा पराभवाचा सामना करणाऱ्या चेन्नईने अखेर युएईच्या मैदानावर मुंबईला धूळ चारली. मुंबईने चेन्नईला १६३ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना अंबाती रायुडूने दमदार ७१ धावांची खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. अंबाती रायडूचा आज वाढदिवस असल्याने त्याला साऱ्यांनीच शुभेच्छा दिल्या. त्यात मुंबई इंडियन्सने दिलेल्या हटके शुभेच्छा भाव खाऊन गेल्या.

अंबाती रायडू चेन्नईकडून खेळण्याआधी मुंबई इंडियन्सच्या संघातून खेळायचा. त्याने मुंबईच्या संघाला अनेक वेळा विजय मिळवून दिले. त्याची फलंदाजी मुंबईच्या संघात असतानाही जोरदार असायची. त्यामुळे रायडूचा मुंबई इंडियन्सची टोपी परिधान केलेला फोटो ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे. या फोटोसोबतच थोड्याशा हटके शब्दात त्याला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. “कायम फलंदाजी करत असणारा (am-batting) अंबाती रायडू याला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा! अशाच दमदार आणि मोठ्या धावसंख्येच्या खेळी करत राहा फक्त मुंबईविरूद्ध धावा करू नकोस अशा मजेशीर शुभेच्छा त्याला मुंबई इंडियन्सकडून देण्यात आल्या.

मुंबई विरूद्धच्या पहिल्या सामन्यात अंबाती रायडूने संयमी सुरूवात केली होती. पण त्यानंतर त्याने दमदार फटकेबाजी केली होती. त्याने ४८ चेंडूत ७१ धावा ठोकल्या होत्या. त्यात ६ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता.

असा रंगला होता सामना-

मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी चांगली सुरूवात केली होती. पण रोहित (१२) झेलबाद झाला. पाठोपाठ क्विंटन डी कॉकही ३३ धावांवर माघारी परतला. सौरभ तिवारीने सर्वाधिक ३१ चेंडूत ४२ धावा केल्या. त्यामुळे मुंबईला २० षटकात ९ बाद १६२ धावांपर्यंतच मजल मारता आली. १६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शेन वॉटसन आणि मुरली विजय स्वस्तात बाद झाले. पण अंबाती रायडू आणि फाफ डु प्लेसिस या जोडीने चेन्नईला विजय मिळवून दिला. रायडूने ७१ धावा ठोकल्या तर तो बाद झाल्यावर डु प्लेसिसने नाबाद राहत ५८ धावांसह संघाला विजय मिळवून दिला.