गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा संघ यंदाही आपल्या बेभरवशी खेळाने इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) बाद फेरीच्या शर्यतीत टिकून आहे. याच पाश्र्वभूमीवर रविवारी वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात त्यांची गाठ कोलकाता नाइट रायडर्सशी पडणार आहे.
मागील लढतीत मुंबईने किंग्ज इलेव्हन पंजाबवर विजय मिळवून गुणतालिकेत आठव्या क्रमांकावरून थेट पाचव्या स्थानी धडक मारली. कर्णधार रोहित शर्माने पुन्हा एकदा संघाला विजयी उंबरठा गाठून दिला असला, तरी त्याच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आढळत आहे. सूर्यकुमार यादव जबरदस्त फॉर्मात असून त्याला जे.पी. डय़ुमिनी, हार्दिक पंडय़ा, एविन लेविस यांची साथ मिळाल्यास मुंबईची फलंदाजी बहरेल. याशिवाय, जसप्रित बुमरा आणि मयांक मरकडे यांच्यावर प्रामुख्याने गोलंदाजीची मदार आहे.
दुसरीकडे कर्णधार दिनेश कार्तिकच्या कोलकात्याने गेल्या सामन्यात चेन्नईसारख्या बलाढय़ संघाला धूळ चारल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. ख्रिस लिन, सुनील नरिन, शुभमन गिल आणि स्वत: कार्तिक सुरेख फलंदाजी करत असून गोलंदाजीतही पीयूष चावला, कुलदीप यादव संघाची धुरा उत्तमपणे वाहत आहेत. याशिवाय गरज पडलीच तर आंद्रे रसेल आपल्या अष्टपैलू खेळाने संघाला एकहाती विजय मिळवून देऊ शकतो. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात मुंबई कोलकात्यालादेखील पराभवाचा धक्का देते का, हे पाहणे रंजक ठरेल.
- सामन्याची वेळ : दुपारी ४ वा.
- थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्सवर
विजयी मार्गावर परतण्यासाठी पंजाब-राजस्थानमध्ये चुरस
पुढील धोका टाळण्यासाठी राजस्थानला सर्व सामन्यांत विजयाची आवश्यकता
यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) अनपेक्षित कामगिरी करत किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ बाद फेरीच्या शर्यतीसाठी अव्वल चौघांमध्ये स्थान टिकवून आहे. मात्र, मागील सामन्यात मुंबईविरुद्ध पराभव पत्करावा लागल्याने रविवारी होणाऱ्या लढतीत राजस्थान रॉयल्सला हरवून पुन्हा एकदा विजयी मार्गावर परतण्याचे लक्ष्य किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे आहे.
धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल दुखापतीतून सावरत संघात परतल्याने पंजाबला दिलासा मिळाला आहे. शिवाय लोकेश राहुल, करुण नायर हेसुद्धा फलंदाजीत सातत्याने योगदान देत आहेत. मात्र, युवराज सिंगचा खराब फॉर्म संघासाठी डोकेदुखी ठरत आहे. गोलंदाजीत प्रामुख्याने मुजीब-उर-रहमान आणि अॅण्ड्रयू टाय यांच्यावर मदार आहे. कर्णधार रविचंद्रन अश्विन मात्र गोलंदाजीत संघर्ष करताना दिसत आहे.
कर्णधार अजिंक्य रहाणेचा राजस्थान स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी झगडत आहे. मागील लढतीत दिल्लीने त्यांच्यावर रोमहर्षकरीत्या मात केली. आठ सामन्यांतून तीन विजयांसह ते सध्या गुणतालिकेत तळाला आहेत. त्यामुळेच या सामन्यात विजय मिळवून स्वत:चे नाक शाबूत राखण्यासाठी ते शर्थीचे प्रयत्न करतील. जॉस बटलरने गेल्या लढतीत सलामीला येऊन अप्रतिम फलंदाजी केली होती. त्याला रहाणे, संजू सॅमसन, बेन स्टोक्सची साथ मिळणे आवश्यक आहे. गोलंदाजीत जोफ्रा आर्चरने प्रतिस्पध्र्याना सळो की पळो अशी अवस्था निर्माण केली आहे. त्याच्याशिवाय जयदेव उनादकट, कृष्णप्पा गौथम आणि श्रेयस गोपाल असे गोलंदाज राजस्थानच्या ताफ्यात आहेत.
- सामन्याची वेळ : रात्री ८ वा.
- थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्सवर
