Mustafizur Rahman 2 Matches in 22 Hours Delhi Capitals : दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमवर रविवारी (१८ मे) रात्री दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स असा आयपीएल सामना खेळवण्यात आला. या सामन्यात गुजरातने दिल्लीवर मात केली. दोन्ही संघांतील फलंदाजांनी या सामन्यात धावांची अक्षरशः लयलुट केली. त्यामुळे गोलंदाजांसाठी हा परीक्षा पाहणारा सामना होता. यामध्ये एका गोलंदाजाने त्याच्या व्यावसायिक निष्ठेमुळे सर्वांचं लक्ष वेधलं. सध्या या खेळाडूची बरीच चर्चा होत आहे.

आयपीएल २०२५ स्थगित झाल्यानंतर आता ही स्पर्धा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, सर्व संघ त्यांच्या परदेशी खेळाडूंना परत एकत्र जमवण्यात व्यस्त आहेत. अनेक खेळाडू त्यांच्या देशांच्या संघांमध्ये सहभागी झाले असल्यामुळे ते आता परत येणार नाहीत. अशातच दिल्ली कॅपिटल्स संघासमोर एक मोठी अडचण निर्माण झाली होती. दिल्लीचा महत्त्वाचा गोलंदाज मिचेल स्टार्क परत येणार नसल्यामुळे दिल्लीसमोर गोलंदाजीचं मोठं आव्हान निर्माण झालं होतं. त्यामुळे दिल्लीने तातडीने बांगलादेशी गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला करारबद्ध केलं.

२,००० किमी प्रवास, २२ तासांत २ देशांत २ सामने

हा करार झाला तेव्हा मुस्तफिजूर यूएईच्या दौऱ्यावर होता. तो तिथे बांगलादेशी संघाकडून खेळत होता. बांगलादेश व यूएईच्या संघात तिथे दोन टी-२० सामने खेळवण्यात आले. यापैकी शनिवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात मुस्तफिजूरने चार षटकांत १७ धावा देत दोन बळी मिळवले. हा सामना संपवून मुस्तफिजूरने भारताची वाट धरली. यूएईविरुद्धचा सामना संपताच तो दिल्लीच्या विमानात चढला. २,००० किलोमीटरचा प्रवास करून तो भारतात दाखल झाला. दुपारी तो दिल्लीची जर्सी परिधान करून दिल्लीच्या खेळाडूंबरोबर सराव करताना दिसला आणि रात्री अरुण जेटली स्डेटियमवर खेळायला उतरला.

रहमानला गुजरातविरुद्धच्या सामन्यात एकही बळी मिळवता आला नाही

प्लेऑफच्या दृष्टीने हा खूप महत्त्वाचा सामना होता. या सामन्यात दिल्लीने केएल राहुलच्या शतकी (११२) खेळीच्या जोरावर २० षटकांत ३ गड्यांच्या बदल्यात १९९ धावा फटकावल्या होत्या. त्याच्या प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सने १९ षटकांत एकही गडी न गमावता १९ षटकांत २०५ धावा झोडत हा सामना जिंकला. मुस्तफिजूर रहमानसह दिल्लीच्या एकाही गोलंदाजाला या सामन्यात बळी मिळवता आला नाही. या विजयासह गुजरातने आयपीएल स्पर्धेच्या प्लेऑफचं तिकीट मिळवलं आहे. तसेच पंजाब व बंगळुरूने देखील प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे.