Punjab Kings Ropes Mitchell Owen: पंजाब किंग्जने रविवारी आयपीएल २०२५ च्या उर्वरित हंगामासाठी ग्लेन मॅक्सवेलच्या जागी अष्टपैलू मिचेल ओवेनला ३ कोटी रुपयांना करारबद्ध केल्याची घोषणा केली. पंजाब किंग्जने एक्स वर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले की, “अपडेट: मिचेल ओवेन टाटा आयपीएलच्या उर्वरित हंगामासाठी ग्लेन मॅक्सवेलच्या जागी संघात सहभागी होईल.”

ऑस्ट्रेलियातील तस्मानियाचा रहिवासी असलेल्या ओवेनने ३४ टी-२० सामन्यांमध्ये ६४६ धावा केल्या आहेत, ज्यात दोन शतके आहेत. टी-२० मध्ये त्याचा सर्वोच्च धावसंख्या १०८ आहे. ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडूने क्रिकेटच्या या स्वरूपात दहा विकेट्स देखील घेतल्या आहेत.

बीग बॅशच्या अंतिम सामन्यात शतक

बिग बॅश लीगच्या गेल्या हंगामात सिडनी थंडरविरुद्धच्या अंतिम सामन्यात ४२ चेंडूत १०८ धावा करत होबार्ट हरिकेन्सला जेतेपद मिळवून देऊन ओवेन प्रसिद्धीच्या झोतात आला होता. गेल्या वर्षी आयपीएलच्या मेगा लिलावात त्याच्यासाठी कोणत्याही संघाने रस दाखवला नव्हता. परंतु पाकिस्तान सुपर लीगमध्ये त्याला पेशावर झल्मी संघाने करारबद्ध केले होते.

दक्षिण आफ्रिकेच्या कॉर्बिन बॉशने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी पीएसएल कराराचा भंग करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ओवेनला पेशावर झल्मीने करारबद्ध केले होते. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, पीएसएलमधील पेशावर झल्मीचे सामने संपल्यानंतर तो पंजाब किंग्जमध्ये सहभागी होणार आहे.

ग्लेन मॅक्सवेलला दुखपात

दरम्यान उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाल्यामुळे मॅक्सवेल आयपीएल २०२५ मधून बाहेर जावे लागले आहे. पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यापूर्वी मॅक्सवेलच्या बोटाला फ्रॅक्चर झाल्याचे स्पष्ट केले होते.

या हंगामात ग्लेन मॅक्सवेलने फलंदाजीत फारशी चमकदार कामगिरी करू शकला नाही. त्याने सहा डावांत फक्त ४८ धावा केल्या आहेत. यातील त्याच्या शेवटच्या चारपैकी चारही सामन्यात त्याला दोन अंकी धावसंख्या गाठता आली नव्हती. पण, मॅक्सवेलने गोलंदाजीत चार विकेट्स घेतल्या आहेत. नोव्हेंबरमध्ये झालेल्या आयपीएलच्या मेगा लिलावात पंजाब किंग्जने ग्लेन मॅक्सवेलला ४.२ कोटी रुपयांना करारबद्ध केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान पंजाब किंग्जसाठी दुखापतींशी संबंधित हा दुसरा धक्का आहे. यापूर्वी, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला आयपीएल २०२५ च्या उर्वरित सामन्यांमधून माघार घ्यावी लागली होती.