RCB cancelled practice session after threat to Virat Kohli : अहमदाबादमध्ये राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील एलिमिनेटर सामन्यापूर्वी धक्कादायक बातमी समोर आली आहे. बुधवार, २२ मे रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर राजस्थान आणि बंगळुरु या दोन संघांमध्ये एलिमिनेटर सामना खेळला जाणार आहे, परंतु त्याच्या एक दिवस आधी, आरसीबीने त्यांचे एकमेव सराव सत्र रद्द केले. विराट कोहलीसह संपूर्ण संघाच्या सुरक्षेला लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. सोमवार, २० मेच्या रात्री अहमदाबादमध्ये पोलिसांनी दहशतवादी कारवायांच्या संशयावरून चार जणांना अटक केली होती, त्यानंतर आरसीबीने सुरक्षा लक्षात घेऊन हा निर्णय घेतला.

आरसीबीचे सराव सत्र रद्द, पोलिसांना धोका असल्याचा संशय

बंगाली वृत्तपत्र आनंद बाजार पत्रिकाने एका वृत्तात म्हटले आहे की, आरसीबीने कोणतेही कारण न देता मंगळवारी नियोजित सराव रद्द केला आहे. केवळ सरावच नाही तर पत्रकार परिषदही रद्द करण्यात आली. मंगळवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या क्वालिफायर सामन्यामुळे आरसीबी आणि राजस्थान गुजरात कॉलेज मैदानावर सराव करणार होते पण आरसीबीने तो रद्द केला. राजस्थान संघ सरावासाठी आला असला तरी त्यांनी पत्रकार परिषद घेतली नाही.

हेही वाचा – ‘गौतम गंभीरची काम करण्याची शैली एखाद्या कठोर वडिलांसारखीच…’, मुख्य प्रशिक्षकपदाच्या चर्चेवर आकाश चोप्राचे मत

या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, गुजरात पोलिसांचा असा विश्वास आहे की विराट कोहलीसारख्या मोठ्या क्रिकेटपटूच्या सुरक्षेचा विचार करून फ्रँचायझीने सराव रद्द करण्याचा निर्णय घेतला. अहमदाबादमध्ये कोहलीसह भारतातील आणि जगातील अनेक क्रिकेटपटूंच्या उपस्थितीत संशयितांची अटक आणि त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांनी सुरक्षा यंत्रणांना सतर्क केले होते. अशा परिस्थितीत पोलिसांनी दोन्ही संघांना याबाबत माहिती दिली, त्यानंतर आरसीबीने सराव रद्द केला, तर राजस्थानने मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. तथापि, आरसीबी किंवा पोलिसांनी याचे कारण म्हणून अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.

राजस्थान रॉयल्सच्या सराव सत्राला कडक बंदोबस्त –

एवढ्या मोठ्या सामन्यापूर्वी सराव न करणे हे आकलनापलीकडचे आहे. एका पोलीस अधिकाऱ्याच्या हवाल्याने वृत्तात म्हटले आहे की, कोहलीलाही ४ जणांच्या अटकेची माहिती मिळाली आणि अशा परिस्थितीत त्यांचे संरक्षण करणे ही पोलीस दलाची सर्वात मोठी प्राथमिकता आहे. आरसीबी व्यवस्थापनाला अशा परिस्थितीत कोणताही धोका पत्करायचा नव्हता आणि त्यामुळेच कदाचित हा निर्णय घेण्यात आला असावा, असा दावा पोलीस अधिकाऱ्याने केला. राजस्थानचा विचार केला तर संघाचा कर्णधार संजू सॅमसनसह अनेक खेळाडू सरावासाठी आले होते, मात्र यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त होता आणि पोलीसही मैदानावर फिरत होते.

हेही वाचा – KKR vs SRH Qualifier 1 : राहुल त्रिपाठी धावबादनंतर भावूक, पायऱ्यांवर बसून रडतानाचा VIDEO व्हायरल

राजस्थान-बंगळुरूमध्ये क्वालिफायरसाठी शर्यत –

एलिमिनेटर सामना आज राजस्थान आणि बंगळुरू यांच्यात होणार आहे. अहमदाबादमधील या मोसमातील हा शेवटचा सामना आहे. हा सामना जिंकणारा संघ क्वालिफायर-२ मध्ये पोहोचेल, जिथे त्याचा सामना पहिल्या क्वालिफायरमध्ये पराभूत झालेल्या सनरायझर्स हैदराबादशी होईल. पराभूत संघ थेट बाहेर होईल. त्यानंतर दुसरा क्वालिफायर चेन्नईमध्ये खेळवला जाईल, विजेत्या संघाला अंतिम फेरीत प्रवेश मिळेल आणि २६ मे रोजी चेन्नई येथे होणाऱ्या विजेतेपदाच्या लढतीत कोलकाता नाईट रायडर्सशी सामना होईल.