आयपीएल २०२५ चा अंतिम सामना अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व पंजाब किंग्स हे संघ पहिलं आयपीएलचं जेतेपद जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत. यादरम्यान आरसीबीचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणावर संघाच्या विजयाची प्रार्थना करत आहेत. यादरम्यान बंगळुरूमधील एकाकारने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
आयपीएलमध्ये आरसीबीचा चाहता वर्ग हा प्रचंड निष्ठावंत आणि संघाशी प्रामाणिक राहिलेला आहे. १८ वर्षात भलेही संघाने आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही, पण चाहत्यांनी दरवर्षी तितकाच भक्कम पाठिंबा संघाला दिला आहे. यंदाही आरसीबीच्या चाहत्यांनी संघाला तितकाच पाठिंबा देत अंतिम फेरी जिंकण्यासाठी चाहते मोठी प्रार्थना करत आहेत.
रॉयल चॅलेंजर्सचा मोठा चाहता वर्ग आहे आणि मंगळवारी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर स्पर्धेच्या निर्णायक सामन्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी होईल अशी अपेक्षा आहे. आरसीबी चौथ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. पण आरसीबी तिन्ही वेळा अंतिम फेरी गमावल्याने चाहते घाबरलेही आहेत.
बंगळुरूमध्ये आरसीबी चाहत्याच्या कारने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सोशल मीडियावर त्या कारचा एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये अंतिम सामन्यासाठी संघाला नजर लागू नये म्हणून पांढऱ्या कारवर लिंबू आणि हिरव्या मिरच्या लावण्यात आल्या आहेत. या कारवर पुढील बाजूला इंग्रजीत ‘Anti Nazar Squad’ लिहिलंय. तर काचेवर ‘ई साला कप नामदे’ असं लिहिलंय. त्यानंतर कारच्या मागील बाजू ‘बिलकुल रिस्क नही लेनेका’ असं लिहिलंय.
रजत पाटीदारच्या नेतृत्त्वाखालील आरसीबी संघ यंदाच्या मोसमात उत्कृष्ट फॉर्मात आहे. प्रत्येक सामन्यात विविध मॅचविनर खेळाडू समोर आले आणि त्यांनी संघाला विजय मिळवून दिला आहे. आता अंतिम सामन्यातही आरसीबीचा संघ कशी कामगिरी करणार यावर सर्वांच्या नजरा असणार आहेत.