IPL 2025 LSG vs RCB Jitesh Sharma 3 Lifelines : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने लखनौ सुपरजायंट्सवर दणदणीत विजय मिळवत आयपीएलच्या क्वालिफायर १ मध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे. आरसीबीने कर्णधार जितेश शर्माच्या वादळी खेळीच्या जोरावर लखनौचा ६ विकेट्सने पराभव केला आहे. याशिवाय आरसीबीने इतिहासात पहिल्यांदाच सर्वात मोठं (२२८) लक्ष्य यशस्वीपणे पार करत विजय मिळवला आणि १४ सामन्यांनंतर गुणतालिकेत दुसरं स्थान मिळवलं आहे. कर्णधार जितेश शर्मा हा बँगलोरच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

जितेश शर्माने अवघ्या ३३ चेंडूत ८ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ८५ धावा चोपल्या. त्याला विराट कोहली (३० चेंडूत ५४) व मयंक अग्रवालची (२३ चेंडूत ४१) चांगली साथ मिळाली. दरम्यान, या सामन्यात जितेश शर्माला तीन वेळा जीवनदान मिळालं होतं. ज्याचा त्याने फायदा करून घेतला.

दिग्वेश राठीकडून मंकडिंग अपील

या सामन्यात लखनौचा फिरकीपटू दिग्वेश राठी गोलंदाजी करत असताना त्याने बंगळुरूचा स्टँड इन कर्णधार जितेश शर्माचं मांकडिंग रनआऊट अपील केलं होतं. जितेशने क्रिज सोडलं होतं. त्यामुळे तो बाद झाला असता, मात्र, लखनौ सुपरजायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतने दिलदारपणा दाखवत दिग्वेशचं अपील मागे घेतलं. त्यामुळे जितेश शर्माला एक संधी मिळाली.

नो बॉलवर झेल

आरसीबीच्या डावातील १७ व्या षटकात जितेश शर्माला आणखी एक जीवनदान मिळालं. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जितेशने स्वीप लगावला. त्यावर आयुष बदोनीने अप्रतिम झेल टिपला. मात्र, मैदानावरील पंचांनी तिसऱ्या पंचांकडे नो बॉल तपासण्याची विनंती केली. तो नो बॉल असल्याचं रिप्लेमध्ये दिसल्याने तिसऱ्या पंचांनी नो बॉल जाहीर केला. परिणामी जितेश नाबाद राहिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धावबाद होता होता वाचला

लखनौचा गोलंदाज विल ओरुर्केविरोधात खेळताना जितेशला आणखी एक जीवदान मिळालं होतं. ओरुर्केचा चेंडू जितेशच्या बॅटच्या कडेला लागून मागच्या दिशेने गेला होता. त्यानंतर मयंक अग्रवाल धावला. मात्र, जितेश जागेवरच उभा राहिला. तोवर क्षेत्ररक्षकाने चेंडू ओरुर्केकडे फेकला. तेव्हा जितेशला धावबाद करण्याची आयती संधी ओरुर्केकडे होती. मात्र, तो चेंडू घेऊन स्टम्प्सच्या दिशेने धावताना पडला आणि चेंडू त्याच्या हातून निसटला. त्या संधीचा फायदा घेत जितेश नॉन स्ट्रायकर एंडच्या दिशेने धावला आणि त्याने त्याची धाव पूर्ण केली. तसेच त्याला जीवदान मिळालं.