राजस्थान रॉयल्सच्या संघाने धडाक्यात सुरुवात करत विजयाचे पंचक साजरे केले होते, पण तरीही त्यांचा संघ एकखांबी तंबू असल्याचे म्हटले जात होते, याचाच प्रत्यय बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सविरुद्धच्या सामन्यात आला. अजिंक्य रहाणे मोठी खेळी न साकारता बाद झाला तर काय होईल, या प्रश्नाचे उत्तर साऱ्यांनाच राजस्थानच्या पराभवाने मिळाले. विश्वचषक गाजवणाऱ्या मिचेल स्टार्कने तीन बळी मिळवत राजस्थानला एकापाठोपाठ एक धक्के दिले. अजिंक्य बाद झाल्यावर अन्य फलंदाजांनीही तंबूत जायची घाई केल्यामुळे त्यांना १३० धावांवर समाधान मानावे लागले. विराट कोहलीच्या दमदार नाबाद अर्धशतकाच्या जोरावर बंगळुरूने राजस्थानवर ९ विकेट्स राखून सहज विजय मिळवला.
राजस्थानच्या आव्हानाचा पाठलाग करणे फारसे कठीण नव्हते. पण ख्रिस गेलने (२०) आततायीपणा करत आपली विकेट गमावली. पण त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि ए बी डी’व्हिलियर्स यांनी संयतपणे फलंदाजी करत संघाला सहज विजय मिळवून दिला. कोहलीने दमदार फलंदाजीचा नमुना पेश करत ४६ चेंडूंत १ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर नाबाद ६२ धावांची खेळी साकारली, तर डी’व्हिीलियर्सने कोहलीला सुरेख साथ देत सहा चौकारांच्या जोरावर नाबाद ४७ धावा केल्या. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ९८ धावांची अभेद्य भागीदारी रचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी, स्टार्क, हर्षल पटेल आणि युझवेंद्र चहल यांनी भेदक मारा करत राजस्थानच्या डावाला वेसण घातले. अजिंक्य रहाणे (१८) झटपट बाद झाल्यावर एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर पाय रोवून मोठय़ा धावसंख्येच्या दिशेने कूच करता आली नाही. हर्षलने अजिंक्यला पायचीत केले. त्यानंतर कर्णधार वॉटसनला (२६) चहलने बाद करत राजस्थानला दुसरा धक्का दिला. स्टीव्हन स्मिथ (३१) खेळपट्टीवर पाय रोवून मोठी खेळी साकारणार असे वाटत असतानाच स्टार्कने त्याला माघारी धाडत संघाला मोठे यश मिळवून दिले. इक्बाल अब्दुल्लाने दीपक हुडाला (१) स्वस्तात बाद केल्यामुळे राजस्थानचे कंबरडे मोडले.
संक्षिप्त धावफलक
राजस्थान रॉयल्स : २० षटकांत ९ बाद १३० (स्टीव्हीन स्मिथ ३१; मिचेल स्टार्क ३/२२) विजयी वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : १६.१ षटकांत १बाद १३४ (विराट कोहली नाबाद ६२, ए बी डी’व्हिलियर्स नाबाद ४७ ; शेन वॉटसन १/२३)
सामनावीर : मिचेल स्टार्क.