Rishabh Pant Century in IPL 2025 Celebration Video Viral: आयपीएल २०२५ च्या संपूर्ण हंगामात खराब फॉर्मातून जात असलेल्या ऋषभ पंतची अखेरच्या सामन्यात बॅट तळपली आहे. संपूर्ण स्पर्धेत धावांचा दुष्काळ पडलेल्या पंतने अखेरच्या सामन्यात शतक झळकावले आहे. आरसीबीसाठी महत्त्वाच्या असलेल्या सामन्यात ऋषभ पंतने मोठी खेळी करत बंगळुरूसाठी मोठी डोकेदुखी ठरला.
लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात हा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात, एलएसजीचा कर्णधार ऋषभ पंतने शानदार कामगिरी केली आणि एक दमदार शतक झळकावले. त्याच्या या शतकी खेळीमुळे संघाने २० षटकांत २२६ धावा केल्या आहेत.
आरसीबीचा कर्णधार जितेश शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनौने चांगली सुरुवात केली, पंतने आक्रमक भूमिका घेत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. पंतने सुरूवातीपासूनच उत्कृष्ट फटके खेळत शानदार फॉर्मात असल्याचं त्याने दाखवून दिलं. त्याने मिशेल मार्शसह दुसऱ्या विकेटसाठी १५२ धावांची भागीदारी केली, ज्यामुळे एलएसजी मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचला. पंतने त्याच्या डावात अनेक शानदार फटके खेळले, त्याच्या खेळीमुळे आरसीबीच्या गोलंदाजांना पूर्णपणे बॅकफूटवर ढकललं.
ऋषभ पंतने १८व्या षटकात ५२ चेंडूत चौकारासह आपलं शतक पूर्ण केलं. ऋषभ पंतचं हे आयपीएलमधील दुसरं शतक आहे. याशिवाय ऋषभ पंत शेवटपर्यंत नाबाद राहत त्याने ६१ चेंडूत ११ चौकार आणि ८ षटकारांसह १९३ च्या स्ट्राईक रेटने ११८ धावांची धुव्वाधार खेळी केली.
ऋषभ पंतला यंदाच्या मोसमातील कामगिरीवरून खूप ट्रोल केलं गेलं. यापूर्वी १२ डावांमध्ये फक्त १५१ धावा करणाऱ्या पंतची सरासरी १३.७३ आणि स्ट्राईक रेट १०७.०९ होता. मुख्य म्हणजे स्पर्धेतील महागडा खेळाडू म्हणून त्याच्या कामगिरीबाबत सर्वांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.