भारताचा सलामीवीर आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटच्या वेगवेगळया स्पर्धांमध्ये ३०० षटकार ठोकणार पहिला भारतीय फलंदाज बनला आहे. इंदूरच्या होळकर स्टेडियमवर काल झालेल्या किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्धच्या सामन्यात रोहितने मुजीब उर रहमानच्या १७ व्या षटकात षटकार ठोकून ३०० षटकारांचा टप्पा गाठला.
या सामन्यात विजय मिळून मुंबईने प्लेऑफमध्ये दाखल होण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. मुंबईला आता उर्वरित सर्व सामने जिंकावेच लागणार आहेत. रोहितने ट्वेंटी-ट्वेंटीच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आतापर्यंत ७८ आणि आयपीएलमध्ये १८३ षटकार ठोकले आहेत. अन्य ४० षटकार चॅम्पियन्स लीग, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि अन्य स्थानिक स्पर्धांममध्ये मारले आहेत.
रोहितच्या नावावर एकूण ३०१ षटकार आहेत. ट्वेंटी-ट्वेंटीमध्ये ख्रिस गेलच्या नावावर सर्वाधिक (८४४), कायरॉन पोलार्डच्या नावावर (५२५), ब्रँडन मॅक्युलमच्या नावावर (४४५), ड्वायेन स्मिथ (३६७), शेन वॉटसन (३५७), डेव्हिड वॉर्नर (३१९) आणि रोहितच्या नावावर (३०१) षटकार आहेत. आयपीएलमध्ये ख्रिस गेलच्या नावावर सर्वाधिक २९० त्या खालोखाल रोहितच्या नावावर १८३ षटकार आहेत. महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैनाने प्रत्येकी १८० षटकार ठोकले आहेत. त्याखालोखाल एबी डिव्हिलियर्सच्या नावावर १७९ षटकार आहेत.

