वानखेडे स्टेडियमला रोहित शर्मा स्टॅन्ड मिळणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वीच करण्यात आली आहे. ज्या मैदानावर तो लहानपणापासून खेळतोय, त्याच मैदानावर हक्काचं स्थान मिळाल्यानंतर रोहितची बॅट चांगलीच तळपली. रविवारी चेन्नई सुपर किंग्ज संघाविरूद्ध झालेल्या सामन्यात रोहितने शानदार अर्धशतकी खेळी केली आणि संघासाठी विजय खेचून आणला. ही खेळी केल्यानंतर त्याच्या फलंदाजीचं कौतुक तर होतंय मात्र, त्याने शेअर केलेल्या इंस्टाग्राम स्टोरीची देखील जोरदार चर्चा होत आहे.

स्टोरी शेअर करत मानले अभिषेक नायरचे आभार

काही दिवसांपूर्वीच माजी भारतीय क्रिकेटपटू अभिषेक नायरची बीसीसीआयच्या सपोर्ट स्टाफमधून सुट्टी करण्यात आली होती. अभिषेक नायर सहाय्यक प्रशिक्षकाच्या भूमिकेत होता. आता त्याची कोलकाता नाईट रायडर्सच्या सपोर्ट स्टाफमध्ये एन्ट्री झाली आहे. दरम्यान अर्धशतकी खेळी केल्यानंतर रोहितने अभिषेक नायरचे आभार मानले आहेत.

रोहित शर्मा गेल्या काही दिवसांपासून आऊट ऑफ फॉर्म आहे. चेन्नईविरूद्ध झळकावलेलं अर्धशतक हे त्याचं या हंगामातील पहिलंच अर्धशतक ठरलं. यापूर्वी त्याला एकही मोठी खेळी करता आली नव्हती. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, रोहित फॉर्ममध्ये परतण्यात अभिषेक नायरचा मोलाचा वाटा आहे. रोहितला फॉर्ममध्ये आणण्यासाठी अभिषेक नायर पडद्यामागचा हिरो म्हणून मेहनत घेत होता. १७ एप्रिलला रोहित अभिषेक नायरसोबत बीकेसीतील मैदानावर सराव करताना दिसून आला होता.

स्टोरी शेअर करत मानले आभार

रोहितने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये त्याने आपला फोटो शेअर करत ‘थँक्स ब्रो.. असं कॅप्शन लिहून अभिषेक नायरला टॅग केलं आहे. अभिषेक नायर भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफचा भाग होता. मात्र भारतीय संघाने गेल्या काही महिन्यात केलेल्या फ्लॉप शो मुळे बीसीसीआयने अभिषेक नायरला सपोर्ट स्टाफमधून बाहेर केल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आता रोहितने इंस्टाग्राम स्टोरी शेअर केल्यानंतर हे तर स्पष्ट झालं आहे की, अभिषेक नायरला सपोर्ट स्टाफमधून बाहेर करण्यात रोहितचा हात नाही.

आऊट ऑफ फॉर्म रोहित फॉर्ममध्ये परतला

चेन्नई सुपर किंग्ज संघाविरूद्ध झालेल्या सामन्यात रोहितची बॅट चांगलीच तळपली. त्याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. या सामन्यात त्याने ७६ धावांची खेळी केली. त्यानंतर नायरचे स्टोरी शेअर करत आभार मानले. या हंगामात त्याला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. त्याला सुरुवातीच्या ५ सामन्यांमध्ये ०,८,१३,१७ आणि १८ इतक्याच धावा करता आल्या होत्या.