Ruturaj Gaikwad’s second century in IPL : आयपीएल २०२४ मध्ये शतकांचा वर्षाव होताना दिसत आहे. चेपॉकमध्ये चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या बॅटमधून या मोसमातील पाचवे शतक झळकले. चेन्नईची सुरुवात खूपच खराब झाली होती, पण कर्णधार गायकवाडने शानदार फलंदाजी करत लखनऊच्या नवाबांची धुलाई केली. ऋतुराज शतक झळकावणारा चेन्नईचा पहिला कर्णधार ठरला आहे. गायकवाडचे आयपीएल कारकिर्दीतील हे दुसरे शतक आहे. त्याने आयपीएल २०२१ मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध पहिले आयपीएल शतक झळकावले होते.
लखनऊचा कर्णधार केएल राहुलने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. चेन्नईची सुरुवात खूपच खराब झाली, सलामीला फलंदाजीला आलेला अजिंक्य रहाणे अवघी १ धाव करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर डॅरिल मिशेलनेही ११ धावांवर आपली विकेट गमावली. मात्र ऋतुराज गायकवाडने एका टोकाकडून संघाची डाव सावरला. त्याने अवघ्या ५६ चेंडूत शतक झळकावले आणि तो शेवटपर्यंत नाबाद राहिला. गायकवाडने ६० चेंडूत १२ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद १०८ धावांची खेळी केली.
शिवम दुबेने ठोकली आतिशी फिफ्टी –
एका टोकाकडून ऋतुराज गायकवाड बॅटने कहर करत होता, तर दुसऱ्या टोकाकडून शिवम दुबेने लखनऊच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याने अवघ्या २७ चेंडूत ३ चौकार आणि ७ गगनचुंबी षटकारांच्या मदतीने ६६ धावांची शानदार खेळी केली. या दोघांच्या शानदार खेळीच्या जोरावर चेन्नई संघाने २१० धावा केल्या. चेन्नई संघाने आयपीएल २०२४ मध्ये घरच्या मैदानावर एकही सामना गमावलेला नाही. डावाच्या शेवटी महेंद्रसिंग धोनीने एक चेंडू खेळून चौकार मारून चाहत्यांचे पैसे वसूल केले. दरम्यान ऋतुराज गायकवाड सीएसकेसाठी दुसरे शतक झळकावणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्याशिवाय मुरली विजय आणि शेन वॉटसनने हा पराक्रम केला आहे.
सीएसकेसाठी आयपीएलमध्ये शतके झळकावणारे फलंदाज –
२-मुरली विजय
२ – शेन वॉटसन
२- ऋतुराज गायकवाड
१ – मायकेल हसी
१ – ब्रेंडन मॅक्युलम
१-सुरेश रैना
१ – अंबाती रायुडू
हेही वाचा – RR vs MI : टीम इंडियाच्या तिसऱ्या वेगवान गोलंदाजाचा शोध संपला! ‘हा’ गोलंदाज घेऊ शकतो मोहम्मद शमीची जागा
या विशेष यादीत मिळवले स्थान –
ऋतुराज गायकवाडने १७व्यांदा सीएसकेसाठी सलामीवीर म्हणून ५०हून अधिक धावा केल्या. तो आता सीएसकेसाठी सर्वाधिक ५०हून अधिक धावा करणारा सलामीवीर बनला आहे. यापूर्वी हा विक्रम फाफ डू प्लेसिसच्या नावावर होता. फाफ डु प्लेसिसने सीएसकेसाठी सलामीवीर म्हणून सोळावा ५०हून अधिक धावा केल्या होत्या. त्याचवेळी ऋतुराज गायकवाडने सीएसकेसाठी सलामीवीर म्हणून २००० धावा पूर्ण केल्या आहेत. सीएसकेसाठी सलामीवीर म्हणून २००० धावा करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.