Sai Sudarshan – Gerald Coetzee Catch: आयपीएल २०२५ स्पर्धेतील एलिमिनेटर १ चा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय सार्थ ठरवत रोहित शर्मा आणि जॉनी बेअरस्टोने मुंबई इंडियन्सला दमदार सुरूवात करून दिली. मुंबई इंडियन्सने या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना २२८ धावांचा डोंगर उभारला. गुजरातला हा सामना जिंकण्यासाठी २२९ धावा करायच्या होत्या.
जॉनी बेअरस्टोला रायन रिकल्टनच्या जागी संधी दिली गेली होती. या संधीचा फायदा घेत त्याने मुंबई इंडियन्सकडून पदार्पणात ४७ धावा चोपल्या. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ८४ धावा जोडल्या. दरम्यान जॉनी बेअरस्टोला बाद करण्यासाठी साई सुदर्शन आणि गेराल्ड कुत्सियाने शानदार झेल घेतला. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
जॉनी बेअरस्टोने गुजरातच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. आधी मोहम्मद सिराज, मग प्रसिद्ध कृष्णाच्या षटकात त्याने धावांचा पाऊस पाडला. मात्र, साई किशोरच्या षटकात त्याला बाद होऊन माघारी परतावं लागलं.
तर झालं असं की, मुंबई इंडियन्सची फलंदाजी सुरू असताना ८ वे षटक टाकण्यासाठी साई किशोर गोलंदाजीला आला. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर जॉनी बेअरस्टोने रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला. मात्र फटका फसल्याने चेंडू साई सुदर्शनच्या हातात गेला. साई सुदर्शन वाइड बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षण करत होता. चेंडू त्याच्यापासून दूर होता. मात्र त्याने डाइव्ह मारत चेंडूची गती कमी केली आणि चेंडू गेराल्ड कुत्सियाकडे ढकलला. या भन्नाट झेलचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मुंबईने उभारला २२८ धावांचा डोंगर
या सामन्यात फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने २० षटकांअखेर ५ गडी बाद २२८ धावांचा डोंगर उभारला. मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माने सर्वाधिक ८१ धावांची खेळी केली. तर जॉनी बेअरस्टोने ४७ धावांची खेळी केली. शेवटी हार्दिक पांड्याने ३३, तिलक वर्माने २५ आणि हार्दिक पांड्याने नाबाद २२ धावांची खेळी केली.