Rohit Sharma Birthday Special: भारतीय संघाचा कर्णधार आणि सर्वांचा लाडका असलेला रो’हिटमॅन’ शर्माचा आज ३७वा वाढदिवस आहे. तुफान फटकेबाजी, रेकॉर्डब्रेकिंग खेळी, उत्कृष्ट नेतृत्त्व कौशल्य आणि विनोदी अंदाज असलेला रोहित शर्मा लहान मुलांपासून ते अगदी दिग्गज क्रिकेटपटूंपर्यंत सर्वांचा आवडता खेळाडू आहे. रोहित शर्माने भारतीय संघासोबतच जवळपास एका दशकाहून अधिक काळ मुंबई इंडियन्सचे नेतृत्त्व करत संघाला एका वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवले. याच मुंबई इंडियन्सने रोहितच्या वाढदिवशी एक खास व्हीडिओ शेअर करत त्याचा वाढदिवस साजरा केला आहे.
मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर रोहित शर्माचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. मुंबईचा राजा रोहित शर्मा असे चाहते रोहितचा उल्लेख करतात अगदी त्याच थाटात रोहितचा हा व्हीडिओ तयार करण्यात आला आहे. या व्हीडिओला ‘सलाम रोहित भाई’ हे गाणं दिलं आहे. केजीएफ चित्रपटातील ‘सलाम रॉकी भाई’ या गाण्यावरून रोहितसाठी एक खास कडवं लिहित सलाम रोहित भाई हे गाणं तयार करण्यात आलं आहे. या गाण्याच्या शेवटी CEO of India असं बॅकग्राऊंडला लिहित पुढे रोहित शर्मा उभा असल्याचे दाखवलं आहे.
रोहितने पत्नी रितिका आणि सूर्यासोबत साजरा केला वाढदिवस
यासोबतच रोहित शर्माच्या सोशल मीडिया टीमकडून म्हणजे ‘team 45 Ro’ कडून एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये रोहित शर्मा, पत्नी रितिका सजदेह, सूर्यकुमार यादव व त्याची पत्नी देविशा शेट्ट्री यांच्यासोबत वाढदिवस साजरा करत आहे. हा फोटोही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. सूर्या नेहमीच रोहितसोबतच असतो, अशा कमेंट्स चाहते करत आहेत.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने एकूण ५९ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने १७ अर्धशतके आणि १२ शतकांसह एकूण ४१३८धावा केल्या आहेत. त्याने २६२ एकदिवसीय सामने खेळले आहेत. रोहितने वनडेमध्ये ५५ अर्धशतके आणि ३१ शतके झळकावली आहेत. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक ३ द्विशतके झळकावणारा रोहित शर्मा हा एकमेव क्रिकेटपटू आहे.याशिवाय रोहित शर्माचा टी-20 क्रिकेटमधील रेकॉर्डही अप्रतिम आहे. रोहितने एकूण १५१ टी-२० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ३१.२९ च्या सरासरीने ३९७४ धावा केल्या आहेत.