BCCI action on Shimron Hetmyer : सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यातील पराभवामुळे राजस्थान रॉयल्सचा आयपीएल २०२४ मधील प्रवास संपला आहे. या सामन्यादरम्यान राजस्थान रॉयल्सचा फलंदाज शिमरॉन हेटमायरने मैदानात असे कृत्य केले, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. बीसीसीआयनेही या क्रिकेटपटूवर तात्काळ कारवाई करत त्याला मोठी शिक्षा सुनावली आहे. बीसीसीआयने शिमरॉन हेटमायरला त्याच्या मॅच फीच्या १० टक्के दंड ठोठावला आहे.
बीसीसीआयची शिमरॉन हेटमायवर कारवाई –
शुक्रवारी रात्री दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्सचा फलंदाज शिमरॉन हेटमायरला सनरायझर्स हैदराबादचा अर्धवेळ फिरकी गोलंदाज अभिषेक शर्माने क्लीन बोल्ड केले. यानंतर आऊट झालेल्या शिमरॉन हेटमायरने रागाच्या भरात स्टंपवर बॅट मारली, ज्यामुळे बीसीसीआयने त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली. शिमरॉन हेटमायर हा आयपीएल आचारसंहितेनुसार लेव्हल एकच्या गुन्ह्यासाठी दोषी आढळला आहे. आयपीएलने प्रेस रिलीजनुसार, राजस्थान रॉयल्स फलंदाज शिमरॉन हेटमायरला २४ मे रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या क्वालिफायर-२ सामन्यादरम्यान आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्या मॅच फीच्या १० टक्के दंड ठोठावण्यात आल्याचे सांगितले आहे.
शिमरॉन हेटमायवर ‘ती’ चूक भोवली –
आयपीएलच्या प्रेस रिलीजनुसार, शिमरॉन हेटमायरने आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.२ अंतर्गत लेव्हल १ गुन्हा केला आहे. आचारसंहितेच्या लेव्हल १ भंगासाठी, सामनाधिकारीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो. अशा परिस्थितीत शिमरॉन हेटमायरने आपली शिक्षा मान्य केली आहे. राजस्थान रॉयल्सच्या डावाच्या १४व्या षटकात अभिषेक शर्माने शिमरॉन हेटमायरला बोल्ड केले. आऊट झाल्यानंतर शिमरॉन हेटमायरने राग काढण्यासाठी स्टंपवर बॅट मारली. शिमरॉन हेटमायर या सामन्यात काही विशेष करू शकला नाही. तो १० चेंडूत ४ धावा करून बाद झाला.
हेही वाचा – SRH vs RR : काव्या मारनने शेवटच्या षटकाचीही वाट न पाहता वडिलांना मारली मिठी, सेलिब्रेशनचा VIDEO व्हायरल
ध्रुव जुरेलचे अर्धशतक ठरले व्यर्थ –
हेनरिक क्लासेनच्या अर्धशतकानंतर, डावखुरा फिरकी गोलंदाज शाहबाज अहमद आणि अभिषेक शर्मा यांच्या फिरकीच्या जादूने, सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा ३६ धावांनी पराभव केला. यासह आयपीएल २०२४च्या अंतिम फेरीत प्रवेश केला, जेथे त्यांचा सामना कोलकाता नाइट रायडर्सशी होणार आहे. सनरायझर्स हैदराबादच्या १७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ध्रुव जुरेल (३५ चेंडूंत नाबाद ५६, सात चौकार, दोन षटकार) अर्धशतक झळकावले.
हेही वाचा – RR vs SRH : सामना हरताना पाहून राजस्थान रॉयल्सची चाहती भावूक, ढसाढसा रडतानाचा VIDEO व्हायरल
तत्पूर्वी सलामीवीर यशस्वी जैस्वाल (४२) यांच्या उत्कृष्ट खेळीमुळे रॉयल्स संघ ७ गडी गमावून केवळ १३९ धावा करू शकला. सनरायझर्सकडून शाहबाजने २३ धावांत तीन तर अभिषेकने २४ धावांत दोन विकेट्स घेतल्या. तत्पूर्वी, क्लासेनच्या अर्धशतकाच्या (३४ चेंडूंत चार षटकारांसह ५० धावा) सनरायझर्सने ९ गडी बाद १७५ धावा केल्या होत्या. क्लासेनने सलामीवीर ट्रॅव्हिस हेड (३४) बरोबर चौथ्या विकेटसाठी ४२ धावांची आणि शाहबाज (१९) सोबत सातव्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी केली. राहुल त्रिपाठीनेही उपयुक्त खेळी (१५ चेंडूत ३७) खेळली.