Sunil Gavaskar Reaction on Virat Kohli- Gambhir Fight: विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वादाने संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. स्टेडियमवरील कोहली- गंभीर- नवीन उल हक यांचा वाद आता इंस्टाग्राम, ट्विटरवर येऊन पोहोचला आहे. आरसीबीच्या विजयाहून अधिक चर्चेत असलेल्या या वादात आता माजी क्रिकेटर व समालोचक सुनील गावसकर यांनी तिखट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. मैदानात झालेल्या वादावरून बीसीसीआयने तिघांवर मॅचच्या फीच्या १०० व ५० टक्के दंड आकारला आहे. पण भविष्यात असे कधीही होणार नाही याची हमी देण्यासाठी दंड भरणे पुरेसे आहे का? असा सवाल सुनील गावसकर यांनी केला.
बीसीसीआयने मंगळवारी कोहली आणि गंभीर यांच्यावर आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल दंड म्हणून संपूर्ण सामन्याची फी आकारली. तथापि, गावसकर यांनी स्टार स्पोर्ट्सशी संभाषणात, भविष्यात अशी मारामारी होणार नाही याची खात्री करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे आवाहन केले.
सुनील गावसकर म्हणतात की, “मी कालचा सामना लाइव्ह पाहिला नाही. या गोष्टी कधीच चांगल्या वाटत नाहीत. १०० टक्के मॅच फी म्हणजे नक्की काय? जर कोहली असेल तर , जो RCB साठी कदाचित १७ कोटींपेक्षा जास्त आहे, म्हणजे उपांत्य फेरी आणि फायनलसह संभाव्य १६ सामन्यांसाठी १७ कोटी. मग आता एका सामन्याचा १०० टक्के म्हणजे त्याला १ कोटीचा दंड होणार आहे का? गंभीर-कोहली यांनी या गोष्टीची पुनरावृत्ती होणार नाही याची खात्री केली पाहिजे. आम्ही खेळायचो त्या काळात सुद्धा वाद होते, पण आता दिसणारा हा आक्रमकपणा नव्हता. अलीकडे प्रत्येक गोष्ट टीव्हीवर असल्याने प्रत्येक गोष्ट अतितीव्र स्वरूपात समोर येते”
हे ही वाचा<< “मी इथे शिव्या ऐकायला…” विराट कोहलीवर नवीन उल हकचा आरोप? संघाला म्हणाला, “मी आयपीएल…”
दरम्यान, पुढे बोलताना गावसकर यांनी या आक्रमकपणावर उपाय म्हणून काही खेळांसाठी या दोघांच्या निलंबनाची मागणी केली आहे जेणेकरून दोन्ही संघाना फटका बसेल व ते खेळाडूंना समजत देतील. “१० वर्षांपूर्वी जेव्हा हरभजन व श्रीसंतच्याबाबत असा वाद झाला होता तेव्हा त्यांना दोन सामने खेळता आले नव्हते. आपण असे काहीतरी पाऊल उचलले पाहिजे जेणेकरून अशा गोष्टी पुन्हा घडणार नाही” असेही गावसकर यांनी म्हंटले आहे.