छोटय़ा लक्ष्याचा यशस्वी बचाव करता येतो याचा वस्तुपाठ देत सनरायझर्स हैदराबादने किंग्ज इलेव्हन पंजाबवर शानदार विजय मिळवला. डेव्हिड वॉर्नरच्या अर्धशतकाच्या जोरावर हैदराबादने दीडशे धावांची मजल मारली. शिस्तबद्ध आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर सातत्याने विकेट्स मिळवत हैदराबादने पंजाबला १३० धावांत रोखले आणि २० धावांनी विजय मिळवला. ट्रेंट बोल्टला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
माफक लक्ष्याचा पाठलाग करताना, वीरेंद्र सेहवागच्या जागी संधी मिळालेल्या मनन व्होरा बोल्टच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने ५ धावा केल्या. भुवनेश्वर कुमारने शॉन मार्शला बाद केले. मुरली विजय आणि जॉर्ज बेली यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र मॉइझेस हेन्रिकेच्या गोलंदाजीवर बेलीने आपली विकेट गमावली. त्याने २२ धावांची खेळी केली. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न मुरली विजयच्या अंगलट आला. त्याने १२ धावा केल्या. डेव्हिड मिलरला या सामन्यातही मोठी खेळी करण्यात अपयश आले. यानंतर वृद्धिमान साहा आणि अक्षर पटेल यांनी सहाव्या विकेटसाठी ४४ धावांची भागीदारी करत पंजाबच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. मात्र ट्रेंट बोल्टने पटेलला त्रिफळाचीत करत ही जोडी फोडली. याच षटकात साहाला प्रवीण कुमारकडे झेल देण्यास भाग पाडत हैदराबादच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पंजाबच्या उर्वरित फलंदाजांना लक्ष्य पेलवले नाही.
तत्पूर्वी सनरायझर्स हैदराबादने अडखळत दीडशे धावांची मजल मारली. शिखर धवन एक धाव करून तंबूत परतला. हनुमा विहारी नऊ धावा करून तो बाद झाला. एका बाजूने फटकेबाजी करणाऱ्या वॉर्नरने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर षटकार खेचण्याचा त्याचा प्रयत्न डेव्हिड मिलरच्या हातात विसावला. वॉर्नरने ४१ चेंडूत १० चौकार आणि एका षटकारासह ५८ धावांची खेळी केली. मॉइझेस हेन्रिके आणि नमन ओझा यांनी चौथ्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी करत डाव सावरला. हेन्रिकेने ३० तर ओझाने २८ धावा केल्या. मिचेल जॉन्सने रवी बोपाराला भोपळाही फोडू दिला नाही. आशिष रेड्डीने २२ धावांची खेळी केल्याने हैदराबादला दीडशेचा टप्पा गाठता आला.
संक्षिप्त धावफलक
सनरायझर्स हैदराबाद : २० षटकांत ६ बाद १५० (डेव्हिड वॉर्नर ५८, मॉइझेस हेन्रिके ३०, नमन ओझा २८, अक्षर पटेल २/२५, मिचेल जॉन्सन २/३९) विजयी विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब : २० षटकांत ९ बाद १३० (वृद्धिमान साहा ४२, जॉर्ज बेली २२, ट्रेंट बोल्ट ३/१९, भुवनेश्वर कुमार २/२३)
सामनावीर : ट्रेंट बोल्ट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व आयपीएल २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunrisers hyderabad beat kings xi punjab by 20 runs
First published on: 28-04-2015 at 01:58 IST