सूर्यकुमार यादवने इंग्लंडविरुद्धच्या टी २० मालिकेमध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा अगदी दणक्यात श्रीगणेशा केला. आपल्या पहिल्याच सामन्यात अर्धशतकाच्या जोरावर सूर्यकुमारने भारतीय संघाला विजय मिळवून देत सामनावीर पुरस्कार पटकावला. घरगुती मालिकांमध्ये मागील बऱ्याच काळापासून उत्तम प्रदर्शन कऱणाऱ्या सूर्यकुमारला पहिल्यांदाच भारतीय संघात स्थान देण्यात आलं आणि त्याने या संधीचं सोनं करुन दाखवलं. आयपीएल २०२० मधील खेळामुळे सूर्यकुमारसाठी भारतीय संघाचे दरवाजे उघडले. यंदाच्या आयपीएलमध्येही सूर्यकुमारकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. ९ एप्रिलपासून आयपीएल सुरु होत आहे. मुंबईच्या संघातून खेळणारा सूर्यकुमार आयपीएलसाठी सज्ज झालाय. ९ एप्रिलला मुंबई विरुद्ध बंगळुरु हा पहिला सामना होणार आहे. मात्र या सामन्याआधीच मुंबई इंडियन्स संघाचा कार्यकारी निर्देशक म्हणून काम पाहणाऱ्या झहीर खानने सूर्यकुमारचं कौतुक केलं आहे.
“सूर्यकुमारबद्दल सर्वात चांगली गोष्ट ही आहे की मागील तीन आयपीएलबरोबरच अनेक घरगुती स्पर्धांमध्ये तो उत्तम खेळ करतोय. भारतीय संघात संधी मिळवण्याचा त्याला हक्क होता. त्याने यासाठी खूप मेहनत घेतली आहे. कधी कधी एक खेळाडू म्हणून खूप संयम ठेवावा लागतो. अनेकदा तुमच्या चांगल्या कामगिरीनंतरही तुम्हाला संधी दिली जात नाही,” असं सूर्यकुमारसंदर्भात बोलताना झहीरने सांगितलं. सूर्यकुमारसोबत हे सारं घडलं आहे. मात्र यासर्व घडामोडींदरम्यान त्याने स्वत:ला छान संभाळलं. त्याच्या आजूबाजूच्या अनेकांनी त्याला तुला संयम ठेवावा लागेल असा सल्ला दिला होता. तु जे करतोय ते करत राहा असंही अनेकांनी सूर्यकुमारला सांगितलं होतं, असं सांगतानाच झहीरने याचा सकारात्कम परिणाम त्याच्या खेळावर दिसून आल्याचं म्हटलं आहे.
“भारतीय संघामध्ये स्थान मिळवणं हे एखादं स्वप्न पूर्ण होण्यासारखं आहे. त्याने मिळालेल्या संधीचा पूर्ण उपयोग केला. आपण या स्तरावरील क्रिकेट खेळण्यासाठी आणि भारताला विजय मिळवून देण्यासाठी सक्षम आहोत हे त्याने आपल्या खेळातून दाखवून दिलं,” अशा शब्दांमध्ये झहीरने सूर्यकुमारचं कौतुक केलं आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर सूर्यकुमार, हार्दिक पंड्या आणि क्रुणाल पंड्या हे मुंबई इंडियन्स संघाच्या सरावाच्या ठिकाणी दाखल झाले आहेत. ते पुण्यावरुन थेट मुंबईत मुंबई इंडियन्सच्या सरावाच्या ठिकाणी पोहचले. या तिघांनाही सात दिवस क्वारंटाइन रहावं लागणार आहे. कर्णधार रोहित शर्माही मुंबई इंडियन्सच्या सराव छावणीत दाखल झालाय. रोहितने आपल्या नेतृत्वाखाली मुंबईला पाच वेळा आयपीएलचा चषक जिंकून दिलाय. मागील वर्षी युएईमध्ये झालेल्या मालिकेमध्ये मुंबईने अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत जेतेपद मिळवलं होतं.