IPL 2025 Suyash Sharma Celebration After Wicket Video: आरसीबीच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत पंजाब किंग्सच्या फलंदाजांना पहिल्या क्वालिफायर सामन्यात पराभवाचा धक्का दिला. पहिल्या क्वालिफायरमधील विजयासह आरसीबीचा संघ थेट आयपीएल २०२५च्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. आरसीबीचे गोलंदाज या सामन्यात मॅचविनर ठरले. मुल्लानपूरच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना मदत मिळत होती. तिथे आरसीबीचं ट्रम्प कार्ड असलेल्या फिरकीपटू सुयश शर्माच्या गोलंदाजीची चमक पाहायला मिळाली. या सामन्यातील त्याच्या कामगिरीवरून सुयश शर्मा आरसीबीचं ट्रम्प कार्ड का आहे, याचा सर्वांनाच अंदाज आला. सुयशच्या या सामन्यातील सेलिब्रेशनने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

आरसीबीचा लेगस्पिनर सुयश शर्माने पंजाब किंग्जच्या फलंदाजांचे कंबरडे मोडले. सुयशने आपल्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात असं काही अडकवलं की संपूर्ण पंजाबचा संघ पूर्णपणे बॅकफूटवर गेला. जिथे वेगवान गोलंदाज फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरत होते, तिथे फिरकीविरूद्ध तरी धावा होतील, असा सर्वांचा समज होता. पण सुयशच्या फिरकीने सामना आरसीबीच्या पक्षात आणला.

सुयशने नवव्या षटकात दुसऱ्याच चेंडूवर शशांक सिंगला क्लीन बोल्ड केलं. यानंतर, पदार्पण करणाऱ्या मुशीर खानला खातेही न उघडता पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. २२ वर्षीय फिरकी गोलंदाजाने पंजाबचा डाव सावरत असलेल्या मार्कस स्टॉयनिसला चकित करत क्लीन बोल्ड केलं आणि त्याला २६ धावांवर माघारी धाडलं.

सुयश शर्मा हे विकेट्स घेतल्यानंतर पंजाब किंग्सच्या डगआऊटकडे बोट दाखवत, मी आहे अजून इथे असा इशारा केला. यानंतर विराटने येऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवत दोघांनीही विकेट्सचा आनंद साजरा केला. सुयश शर्माने यंदाच्या मोसमात १२ सामन्यांमध्ये फक्त ५ विकेट घेतले होते. पण तरीही संघ सातत्याने त्याला खेळण्याची संधी देत होता. या संधीचं सोनं करत त्याने क्वालिफायरमध्ये ३ विकेट्स देत आपल्या कामगिरीची छाप पाडली.

१७ धावा देत ३ विकेट्स घेणारा सुयश शर्मा या सामन्याचा सामनावीर खेळाडू ठरला. सामनावीराचा पुरस्कार जिंकल्यानंतर सुयश म्हणाला, कोचने मला एक रोल दिला होता, तो म्हणजे सातत्याने स्टम्पवर मारा करणं, मग लेगब्रेक असूदे गुगली असू दे किंवा इतर काही प्रकारचे चेंडू असूदे. गुगली माझा स्टॉक बॉल आहे म्हणू शकतो आणि त्याचबरोबर पिचकडूनही गोलंदाजी करताना मदत मिळत होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरसीबीने नाणेफेक जिंकत पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं आणि अवघ्या १४.१ षटकांत संपूर्ण संघाला १०१ धावांवर सर्वबाद केलं. यामध्ये आरसीबीच्या सर्व गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. तर प्रत्युत्तरात फिल सॉल्टच्या नाबाद ५६ धावांच्या जोरावर आरसीबीने १० षटकांत विजय नोंदवला.