एका ओव्हरमध्ये पाच सिक्स मारणाऱ्या रिंकूची KKR विरूद्ध गुजरातच्या सामन्यामधली कामगिरी पुढचे अनेक दिवस चर्चेत राहिल विसरी पडणार नाही यात शंकाच नाही. रिंकू सिंगने गुजरात टायटन्सच्या विरोधात पाच षटकार मारून जी कामगिरी केली आहे त्यामुळे रिंकू सिंग हिरो झाला आहे. गुजरातच्या विरोधात कोलकाताने जवपास गमावलेली मॅच रिंकूने आपल्या बॅटिंगच्या जोरावर खेचून आणली. २१ चेंडूंमध्ये त्याने नाबाद ४८ धावा केल्या. यानंतर त्याने आपल्या आयुष्यात संघर्ष कसा होता आणि आत्ता कसे ते दिवस पालटले हे सांगितलं आहे.
काय म्हटलं आहे रिंकू सिंगने?
मी जेव्हा मैदानात बॅटिंग करायला आलो तेव्हा माझ्याकडून चांगले शॉट बसत नव्हते. तसंच रशिदने हॅट ट्रीक केली तेव्हा आमच्यासाठी मॅच कठीण झाली होती. पण शेवटपर्यंत खेळलं पाहिजे हिंमत हरण्यात अर्थ नाही त्याच उर्मीतून मी सामना खेळलो असं रिंकूने सांगितलं आहे.
कोलकाताचा धोनी असं रिंकूला म्हटलं जातं आहे त्यावर काय म्हणाला रिंकू?
आयपीएलच्या गुजरात विरोधातल्या सामन्यात कमाल केल्यानंतर रिंकूची तुलना धोनीसोबत होते आहे. त्याला कोलकाता टीमचा धोनी म्हटलं जातं आहे याबाबत विचारलं असता तो म्हणाला की माही हा ग्रेट क्रिकेटर आहे त्याची आणि माझी तुलना होऊ शकत नाही. मी जसा आहे तसंच मला राहुद्या, मी त्यांच्याशी तुलना करू शकत नाही.
कुटुंबावर कर्ज होतं आता वेळ बदलली
रिंकू सिंगने आपल्या घरातल्या परिस्थितीवरही भाष्य केलं आहे. तो म्हणाला केकेआरच्या त्या मॅचने माझं आयुष्य बदललं. मी जे काही करतो आहे ते आपल्या कुटुंबासाठी करतो आहे. आता सगळ्या अडचणी, संघर्ष दूर झाला आहे. माझे वडील अद्यापही जॉब करत आहेत. मी त्यांना हे सांगितलं की जॉब सोडून द्या. पण त्यांचं मन लागत नाही त्यामुळे ते नोकरी करत आहेत. असं रिंकू सिंगने एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.मी सध्या माझा पूर्ण फोकस आयपीएलवर केंद्रीत केला आहे. मात्र टीम इंडियासाठी खेळणं हे माझं लक्ष्य आहे असंही रिंकूने सांगितलं आहे.