आयपीएलमध्ये आपल्या तुफान फलंदाजीने चांगल्या चांगल्या गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या विराट कोहलीला यंदाच्या आयपीएल हंगामात फॉर्म गवसला नाही. विशेष म्हणजे या आयपीएल हंगामात तीन वेळा पहिल्याच चेंडूवर बाद होण्याची नामुश्की देखील विराटवर ओढावली. मात्र, पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यानंतर विराट स्मित हास्य करत तंबूत परतताना दिसला. रॉयल चॅलेंजर्सचा माजी कप्तान विराटने यावर अद्याप भाष्य केलं नव्हतं. मात्र, आता त्याने पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यानंतर हसण्याचं कारणही सांगितलं आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने पोस्ट केलेल्या एका व्हिडीओत विराट कोहली म्हणाला, “आतापर्यंतच्या माझ्या क्रिकेट करियरमध्ये पहिल्याच चेंडूवर बाद होण्याची घटना घडली नव्हती. मात्र, या हंगामात पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यानंतर आता मी प्रत्येक अनुभव घेतला असं वाटून मी हसलो. या खेळात जे पाहायला हवं ती प्रत्येक गोष्ट मी पाहिली आहे.”

दरम्यान, कोहलीच्या फॉर्मवरूनही त्याच्यावर टीका होत आहे. अनेक माजी क्रिकेटर त्याला सल्ला देत आहेत. यात विराटचे निकटवर्तीय आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचाही समावेश आहे. रवी शास्त्री यांनी विराटने काही काळ ब्रेक घ्यायला हवा असं सुचवलं. आता विराटने आपल्या फॉर्मवरून येणाऱ्या प्रतिक्रियांवर आपली भूमिका स्पष्ट केलीय.

“ते माझं आयुष्य जगू शकत नाही”

“ते माझ्या भूमिकेत येऊन विचार करू शकत नाही, त्यांना मला काय वाटतं हे समजू शकत नाही. ते माझं आयुष्य जगू शकत नाही. त्यामुळे या गोंगाटापासून दूर राहण्यासाठी टीव्हीचा आवाज बंद करणे किंवा लोक काय बोलत आहेत याकडे लक्ष न देणे हे पर्याय निवडावे लागतात. मी दोन्ही पर्यायांचा अवलंब करतो,” असंही विराट कोहलीने नमूद केलं.

हेही वाचा : विराटने विश्रांती घ्यायला हवी का? दिलीप वेंगसरकर म्हणाले, “तुम्ही अयशस्वी ठरताय आणि…”

कोहलीसाठी हा दुसरा आयपीएलचा खराब हंगाम आहे. त्याने या हंगामात १२ सामन्यांमध्ये केवळ २१६ धावा केल्या आहेत. या १२ सामन्यांपैकी तीन सामन्यात विराट पहिल्याच चेंडूवर बाद झाला. तीनपैकी दोन सामने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळले गेले, तर एक सामना लखनौ सुपर जाएंट्सविरुद्ध खेळला गेला.