Virat Kohli Gets Tribute From RCB Fans and Nature Video: विराट कोहलीने अचानक १२ मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती होत असल्याची घोषणा केली. विराट कोहलीच्या या निर्णयाचा सर्वांनाच धक्का बसला. कसोटीमधील भारताचा महान खेळाडूंपैकी असलेल्या विराटला निरोपाचा सामना खेळताना पाहण्याची चाहत्यांची इच्छा अपूर्ण राहिली. यामुळे विराटला निरोप देण्यासाठी आणि त्याच्या कसोटी कारकिर्दीला सलाम करण्यासाठी चाहत्यांनी पांढरी जर्सी घालून य़ेण्याचं ठरवलं होतं. पण यादरम्यान निसर्गानेही विराटला अनोखा ‘Tribute’ दिला.
१७ मे रोजी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यासाठी हजारो चाहते पांढऱ्या जर्सी घालून आले होते. संपूर्ण स्टेडियममध्ये पांढऱ्या रंगाची जर्सी घातलेले चाहते दिसत होते. कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर विराट पहिल्यांदाच मैदानात क्रिकेट खेळताना दिसणार होता.
विराटला सलाम करण्यासाठी आणि त्याच्या कसोटी क्रिकेटमधील योगदानासाठी त्याचे आभार मानण्याकरता हजारोच्या संख्येने चाहते उपस्थित होते. पण विराटला मैदानावर खेळताना पाहण्याची संधी त्यांना मिळाली नाही. बंगळुरूमध्ये पावसाने संपूर्ण सामन्यात हजेरी लावली होती. सामन्याची नाणेफेकही झाली नाही. शेवटी वाट पाहिल्यानंतर अखेरीस १०.३० च्या सुमारास सामना रद्द झाल्याचे घोषित करण्यात आले.
पावसाची संततधार सुरूच होती. दरम्यान विराटसाठी सर्व चाहते पांढरी जर्सी घालून पोहोचले होते. पण या पावसात सुद्धा निसर्गानेही विराटच्या कसोटी कारकिर्दीसाठी त्याचे आभार मानले. पाऊस पडत असताना पांढऱ्या पक्ष्यांचा थवा आकाशातून उडताना दिसून आला. ज्याचा व्हीडिओ तुफान व्हायरल होत आहे.
जेव्हा पांढऱ्या पक्ष्यांनी आरसीबीच्या होम ग्राउंडमध्ये प्रवेश केला तेव्हा अनेकांनी या क्षणाचा व्हीडिओ काढल आहे. कोहलीच्या चाहत्यांनी म्हटलंय की निसर्गही त्याला सलाम करत आहे. अनेक चाहत्यांनी असा दावाही केला आहे की सुमारे ४९ कबुतरे उडत होती आणि या पक्ष्यांच्या थव्याने ‘१८’ आकडा बनवला जो विराटचा जर्सी नंबर आहे.
सामन्याची नाणेफेक संध्याकाळी ७ वाजता होणार होती. सामना ७.३० वाजता सुरू होणार होता. पण सततच्या पावसामुळे ३ तासांनंतरही नाणेफेक होऊ शकली नाही. दरम्यान, कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर कोहलीचे चाहते त्याला पांढऱ्या जर्सीमध्ये त्याचे आभार मानण्यासाठी वाट पाहत राहिले आणि त्यांना निराश होत माघारी परताव लागलं.