Virat Kohli Takes Two Catches Video: आयपीएल २०२३चा ४३वा सामना सोमवारी लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात खेळला गेला. या सामन्यात आरसीबीने एलएसजीचा १८ धावांनी पराभव केला. लखनऊविरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा विराट कोहलीने आपल्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाने सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले. कोहलीने या सामन्यात दोन शानदार झेल घेतले. त्यानंतर विराटने केलेल्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
या सामन्यातील चौथ्या षटकांत ग्लेन मॅक्सवेलने क्रृणाल पांड्याला विराटच्या हाती झेलबाद केले. त्याने इनसाइट आऊट शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पंरतु कोहलीने लाँगऑफवर त्याचा झेल घेतला. क्रृणाल पांड्या १४ धावांचे योगदान दिले. हा लखनऊ संघाला ३.२ षटकात १९ धावांवर बसलेला दुसरा झटका होता. यानंतर लखनऊ संघाच्या अडचणी वाढत गेल्या.
जोश हेझलवूडने टाकलेल्या पाचव्या षटकाच्या पहिला चेंडू आयुष बडोनीने कव्हर्सकडे खेळला. हा चेंडू काही काळ हवेत होता. यानंतर तिथे असलेल्या कोहलीने हवेत उंच उडी मारत विलक्षण झेल टिपला. त्यामुळे बडोनीला तंबूत परतावे लागले. यानंतर किंग कोहलीने या विकेटचे रागाने जोरात सेलिब्रेशन केले. त्याने स्टेडियमधील चाहत्यांकडे पाहत तोंडावर बोट ठेवले. अशाप्रकारे सेलिब्रेशन करुन विराट हे दाखवून देत होता की, त्याने मागील सामन्यात गौतम गंभीरने केलेल्या कृतीचा बदला घेतला आहे.
आयपीएल २०२३ च्या १५ व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाच्या विजयानंतर गौतम गंभीरने डगआउटमध्ये जोरात ओरडून प्रेक्षकांना गप्प राहण्याचा इशारा केला होता. अशा स्थितीत विराट कोहलीने लखनौच्या घरच्या मैदानावर नेमका हाच इशारा केला. ज्याचा व्हिडीओ आता जोरदार व्हायरल होत आहे. तसेच लखनौविरुद्ध दोन जबरदस्त झेल घेतल्यानंतर कोहलीने स्टेडियममध्ये उपस्थित अनुष्काला फ्लाइंग किस दिला, त्यानंतर अनुष्कानेही त्याला प्रोत्साहन दिले. चौथ्या षटकात कोहलीने पहिला झेल घेतला. त्याचबरोबर दुसरा झेल पाचव्या षटकात घेतला.
सामन्याबद्दल बोलायचे तर, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने २० षटकांत ९ गडी गमावून १२६ धावा केल्या. कर्णधार फाफ डुप्लेसिसने सर्वाधिक ४४ धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनऊचा संघ १९.५ षटकांत १०८ धावांवर गारद झाला. लखनऊकडून कृष्णप्पा गौतमने १३ चेंडूत सर्वाधिक २३ धावा केल्या. या पराभवासह लखनऊचा संघ दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. त्याचे नऊ सामन्यांतून पाच विजय आणि चार पराभवांसह १० गुण आहेत. त्याचवेळी बंगळुरूचेही नऊ सामन्यांत पाच विजय आणि चार पराभवांसह १० गुण आहेत. बंगळुरूचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे.