Mohit Sharma Latest Statement About IPL Final 2023 : चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने शेवटच्या दोन चेंडूवर चौकार-षटकार ठोकल्याने आयपीएलच्या फायनलमध्ये गुजरात टायटन्सचा पराभव झाला. गुजरातचा गोलंदाज मोहित शर्माने जर ते दोन चेंडू अचूक टप्प्यावर फेकले असते, तर कदाचित सामन्यात वेगळाच रोमांच पाहायला मिळाला असता. शेवटच्या षटकातील पहिले चार चेंडू मोहित शर्माने यॉर्कर फेकून चेन्नईच्या फलंदाजांना घाम फोडला होता. पंरतु, जडेजाने त्या दोन चेंडूंवर दहा धावा कुटल्या आणि चेन्नईने आयपीएलचा किताब पाचव्यांदा जिंकला. अशातच मोहित शर्माने त्या षटकाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना मोहित शर्माने त्या शेवटच्या षटकातील रणनितीबाबत प्रतिक्रिया दिलीय. मोहित म्हणाला, मला जे करायचं होतं त्यात माझी रणनिती स्पष्ट होती. नेट्समध्ये मी अशा परिस्थितींचा अभ्यास केला होता आणि याआधीही मी अशा परिस्थितींचा सामना केलेला आहे. त्यामुळे मी यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न करत होतो. मी ते दोन चेंडू कशाप्रकारे फेकणार आहे, याबाबत त्यांना जाणून घ्यायचं होतं. मी इथेही यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करेल. लोक याबाबत जी काही चर्चा करत आहेत, ती खोटी आहे. मला माहितं होतं की, मला काय करायचं आहे.
तसंच सामना हरल्यानंतर त्यांच्यावर काय परिस्थिती निर्माण झाली होती, याबाबतही मोहिने प्रतिक्रिया दिली. मी झोपू शकलो नाही. मी काय वेगळं करू शकलो असतो, ज्यामुळे सामना जिंकला असता, असा मी विचार करत होतो. जर मी त्या चेंडूला दुसऱ्या लेंथवर फेकलं असतं, तर काय झालं असतं, हा माझ्यासाठी चांगला अनुभव नव्हता. कुठे ना कुठे काहितरी राहिलं. पण मी पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे.