भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पठाणची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे, ज्यामध्ये त्याने माजी कर्णधार एमएस धोनीबरोबरच्या त्याच्या नात्याबद्दल वक्तव्य केलं आहे. मध्यंतरी एका मुलाखतीत धोनीमुळे त्याची कारकीर्द संपुष्टात आल्याचं देखील त्याने म्हटलं होतं.
इरफान पठाणने हुक्का प्रकरणाचे वर्णन करतानाच्या व्हिडिओमुळे बराच वाद निर्माण झाला. त्यात पठाणने म्हटलं होते की धोनी हुक्का ओढायचा आणि त्याच्याबरोब हुक्का ओढणाऱ्या खेळाडूंना तो पाठिंबा देत होता. पठाणच्या या वक्तव्याची मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवली गेली आणि त्यामुळे बराच वाद निर्माण झाला.
इरफान पठाणच्या व्हायरल होत असलेल्या व्हीडिओमध्ये त्याने २००८ मधील ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान धोनीबरोबर केलेल्या संभाषणाचा खुलासा केला. माध्यमांमध्ये असं म्हटलं जात होतं की इरफान पठाणच्या गोलंदाजीमुळे धोनी नाराज आहे, त्यामुळे त्याला संघात संधी मिळत नाहीये आणि याबाबत धोनीला खरंच असं वाटतं का, हे तो धोनीसह बोलण्यासाठी गेला होता.
इरफान म्हणाला, “हो मी विचारलं त्याला. २००८ मधील ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान धोनीचं वक्तव्य आलं होतं की, इरफान चांगली गोलंदाजी करत नाहीये. माझ्यामते मी मालिकेत चांगली गोलंदाजी केली होती. त्यामुळे मी मी धोनीजवळ गेलो आणि त्याच्याशी बोलली. काहीवेळेस माध्यमं वक्तव्य वाढवून चढवून सांगतात. धोनी म्हणाला, नाही इरफान असं काही नाहीये. रणनितीप्रमाणे सर्व गोष्टी पुढे जातायत.”
पुढे इरफान म्हणाला, “असं उत्तर आपल्याला मिळाल्यानंतर आपला विश्वास बसतो की आपण नीट कामगिरी करतोय. सातत्याने जर तुम्ही प्रत्येक गोष्ट विचारायला गेलात तुमचा स्वाभिमानही दुखावतो.”
धोनीच्या हुक्काबद्दल वक्तव्यावर इरफान म्हणाला, “मला कोणासाठी रूममध्ये हुक्का सेट करण्याची सवय नव्हती आणि कोणत्याही विषयांवर चर्चा करणं नाही आवडायचं. सर्वांना हे माहित आहे. क्रिकेटपटूचं काम हे मैदानावर चांगली कामगिरी करणं असतं आणि माझं कायम तेच लक्ष्य होतं.”
धोनीच्या हुक्कासंबंधित वक्तव्याबाबत व्हायरल व्हीडिओवर इरफान पठाणची प्रतिक्रिया
इरफान पठाणने एक्सवर पोस्ट शेअर करत लिहिलं, तो अर्धा दशक जुना व्हीडिओ आहे आणि आता त्या व्हीडिओमधील वक्तव्य तोडून मोडून चुकीच्या पद्धतीने व्हायरल केलं जात आहे. हे चाहत्यांमधील द्वंद आहे की पीआर लॉबी नक्की काय? असा सवाल इरफानने उपस्थित केला आहे.