सय्यद रहीम नबी हा भारतीय फुटबॉलमधील अष्टपैलू खेळाडू. मैदानावर कोणत्याही आघाडय़ांवर खेळताना नबीने अनेक वेळा भारताला विजय मिळवून दिले आहेत. पण नबीला खरी लोकप्रियता इंडियन सुपर लीगमुळे (आयएसएल) मिळाली. आयएसएलमधील मुंबई सिटी एफसी संघाचे नेतृत्व सांभाळताना चॅम्पियन्स लीगमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या मॅन्यूएल फ्राइडरिचसारख्या अव्वल फुटबॉलपटूंसोबत खेळण्याचे माझे स्वप्न सत्यात उतरले, असे सय्यद रहीम नबीने सांगितले.
‘‘प्रशिक्षकांनी मला गोलरक्षकाची भूमिका निभावायला सांगितली तर त्यासाठीही हसतमुखाने तयार होईन. फ्राइडरिचसोबत खेळताना अनेक गोष्टी शिकायला मिळतात. इतका मोठा खेळाडू असूनही अहंभाव नसल्यामुळे तो नेहमी आम्हाला मार्गदर्शन करायला तयार असतो,’’ असे २०१२मध्ये एआयएफएफचा सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार पटकावणाऱ्या नबीने सांगितले.
फुटबॉलमधील आपल्या प्रवासाविषयी तो म्हणाला, ‘‘सात भावंडे असलेल्या मोठय़ा कुटुंबातून मी आलो आहे. माझा एक भाऊ मोहम्मदेन स्पोर्टिग क्लबतर्फे खेळत असून त्याच्याकडे अफाट गुणवत्ता आहे. मी टाटा फुटबॉल अकादमीत घडलो. सुरुवातीपासून मला कुटुंबियांचा पाठिंबा लाभल्यामुळे मी इथवर मजल मारू शकलो.’’ भारतातर्फे ७० आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या नबीने इस्ट बंगाल आणि मोहन बागान या आय-लीग स्पर्धेतील क्लबचे प्रतिनिधित्व केले आहे.