जॉक्स (फ्रान्स) : एकीकडे दीड वर्षाची मुलगी आणि दुसरीकडे ऑलिम्पिक पदकाची आकांक्षा, अशा कात्रीत भारताची तिरंदाज दीपिका कुमार अडकली आहे. मात्र, आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवून ऑलिम्पिकमध्ये यशस्वी कामगिरी करण्यास दीपिका सज्ज झाली आहे.
‘‘मुलीपासून दूर राहण्याचे दु:ख शब्दांत मांडणे खूप अवघड आहे. मात्र, ऑलिम्पिक पदकही मला खुणावत आहे. यासाठी मी खूप वर्षे मेहनत घेतली आहे. पॅरिसला रवाना होण्यापूर्वी मी पती अतानू दासच्या साथीने मुलगी वेदिकाला पुण्यातील लष्कराच्या क्रीडा केंद्रात बरोबर घेऊन आले. या वेळी माझ्यापेक्षा मुलीने दाखवलेला संयम महत्त्वाचा होता. पती अतानू आणि माझ्या सासरच्यांशी तिने छान जुळवून घेतले आहे. त्यामुळेच मी निर्धास्त होऊन ऑलिम्पिकसाठी येऊ शकले,’’ असे दीपिका म्हणाली.
‘‘आई झाल्यानंतर दीपिकाचे पुनरागमन खूप अवघड होते. तिला खेळ दूर, रोजची कामेही करता येत नव्हती. प्रथम जॉगिंग आणि नंतर हलकासा सराव सुरू करुन दीपिकाने शू्न्यापासून सुरुवात केली,’’ असे दीपिकाचा पती आणि आंतरराष्ट्रीय तिरंदाज अतानूने सांगितले.