राजकोट : वयाच्या सहाव्या वर्षी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केल्यापासूनच एके दिवशी आपण वडिलांच्या उपस्थितीत भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचे, असे सर्फराज खानचे स्वप्न होते. दोन दशकांच्या मेहनतीनंतर अखेर हे स्वप्न गुरुवारी साकार झाले. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत सर्फराजला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली. या संधीसाठी त्याला अनेक वर्षे वाट पाहावी लागली होती. त्यामुळे बुधवारी माजी कर्णधार अनिल कुंबळे यांच्याकडून सर्फराजने आपली ‘कसोटी कॅप’ मिळवल्यानंतर मैदानावर उपस्थित त्याचे वडील नौशाद अत्यंत भावूक झाले होते. सर्फराजने त्यांना मिठी मारल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले.
हेही वाचा >>> Ind vs Eng: सर्फराझ, संधी आणि सफर
‘‘आपण आता कसोटी क्रिकेट खेळणार हे माहीत असताना प्रथमच मैदानावर येणे आणि वडिलांसमोर ‘कसोटी कॅप’ मिळवणे हे माझ्यासाठी स्वप्नवत होते. मी वयाच्या सहाव्या वर्षी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. वडिलांच्या उपस्थित भारतासाठी खेळायचे हे तेव्हापासूनच माझे स्वप्न होते. ते पूर्ण झाल्याचा खूप आनंद आहे,’’ असे सर्फराज पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर म्हणाला.
हेही वाचा >>> IND vs ENG : सर्फराझ खानने पहिली धाव काढताच पत्नी आणि वडिलांची ‘अशी’ होती प्रतिक्रिया
भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळणारा ३११वा खेळाडू असणाऱ्या सर्फराजने पदार्पणाच्या डावात ६६ चेंडूंत ६२ धावांची आक्रमक खेळी केली. मात्र, सर्फराजला फलंदाजीची संधी मिळण्यासाठी बराच वेळ वाट पाहावी लागली. भारताने तीन गडी झटपट गमावल्यानंतर रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी द्विशतकी भागीदारी केली. अखेरच्या सत्रात रोहित बाद झाल्यानंतर सर्फराज फलंदाजीला आला आणि त्याने अर्धशतक साकारले. ‘‘मी जवळपास चार तास पॅड घालून बसून होतो. मात्र, आपण आयुष्यात इतका संयम ठेवला आहे आणि अजून काही काळ ठेवायला हरकत नाही, असे स्वत:ला सांगत राहिलो. फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर सुरुवातीला मला दडपण जाणवत होते. परंतु, या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतल्याने, खूप सराव केल्याने मला यश मिळाले,’’ असे सर्फराजने सांगितले.