scorecardresearch

‘कॅलिस’नामा!

महान क्रिकेटपटूने कशा प्रकारे क्रिकेटजगताला अलविदा करावा, याची प्रचीतीच जणू जॅक कॅलिसने दिली. क्रिकेटविश्वातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू

‘कॅलिस’नामा!

महान क्रिकेटपटूने कशा प्रकारे क्रिकेटजगताला अलविदा करावा, याची प्रचीतीच जणू जॅक कॅलिसने दिली. क्रिकेटविश्वातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू हे बिरूद जपणारा कॅलिस आता आपल्या कारकीर्दीतील अखेरची कसोटी शानदार शतकानिशी संस्मरणीय करण्याच्या बेतात आहे. भारतीय खेळाडूंचा ‘गार्ड ऑफ ऑनर’ आणि क्रिकेटरसिकांच्या अभिवादनाचा स्वीकार करीत कॅलिस मैदानावर आला, तोच मुळी एक अजरामर खेळीसह ‘कॅलिसनामा’ लिहिण्याचे स्वप्न उराशी बाळगून. अपेक्षेप्रमाणेच त्याने दक्षिण आफ्रिकेला सावरणारी खेळी साकारली आणि आता अर्धशतकाकडून शतकाकडे कूच करीत आहे. या यादगार प्रवासात शनिवारी दिवसअखेरीस कॅलिसवर साक्षात पर्जन्याभिषेकही झाला. खेळ थांबला तेव्हा कॅलिसच्या खात्यावर २२४ चेंडूंत १० चौकारांसह ७८ धावा होत्या, तर डेल स्टेनने आपले खाते उघडले नव्हते.
किंग्समेडवर दक्षिण आफ्रिकेची अवस्था ३ बाद ११३ अशी असताना जॅक कॅलिस आणि ए बी डी व्हिलियर्स यांनी चौथ्या विकेटसाठी १२७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. जडेजाने ही जोडी फोडण्यात यश मिळवले. डी व्हिलियर्सचा पहिल्या स्लिपमध्ये विराट कोहलीने सुरेख झेल टिपला. ३८ वर्षीय कॅलिस मात्र आपल्या कसोटी कारकिर्दीतील ४५व्या शतकाकडे वाटचाल करीत आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने ५ बाद २९९ अशी मजल मारली आहे. दक्षिण आफ्रिकेकडून अल्विरो पीटरसन (६२), डी व्हिलियर्स (७४) आणि कॅलिस अशा तिघांनी अर्धशतके झळकावली. आर. अश्विनऐवजी भारतीय संघात स्थान मिळवणाऱ्या रवींद्र जडेजाने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांवर आपल्या फिरकीचा अंकुश ठेवला आणि ८७ धावांत ४ बळी घेण्याची किमया साधली.
दक्षिण आफ्रिकेचे पहिले तीन फलंदाज पहिल्या सत्रात बाद झाले, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात प्रत्येकी एकेक फलंदाज बाद झाला. सकाळच्या सत्रात ग्रॅमी स्मिथ (४७) आणि अल्विरो पीटरसन यांनी आपला डाव पुढे सुरू केला. नंतर पीटरसनने आपल्या २८व्या कसोटीत सातव्या अर्धशतकाची नोंद केली. परंतु एकूण २४व्या आणि सकाळच्या चौथ्या षटकात पीटरसनला तिसऱ्या पंचांनी जीवदान दिले. शतकी सलामीची भागीदारी रचणाऱ्या या जोडीला फोडण्याचे कार्य जडेजाने पार पाडले. उंच फटका खेळण्याच्या नादात असलेल्या स्मिथचा शिखर धवनने मिड विकेटला झेल टिपला.
धावफलक
भारत (पहिला डाव) : ३३४
दक्षिण आफ्रिका (पहिला डाव) : ग्रॅमी स्मिथ झे. धवन गो. जडेजा ४७, अल्विरो पीटरसन झे. विजय गो. जडेजा ६२, हशिम अमला त्रिफळा गो. शमी ३, जॅक कॅलिस खेळत आहे ७८, ए बी डी व्हिलियर्स झे. कोहली गो. जडेजा ७४, जे पी डय़ुमिनी पायचीत गो. जडेजा २८, डेल स्टेन खेळत आहे ०, अवांतर (लेगबाइज ६, वाइड १) ७, एकूण १०४.५ षटकांत ५ बाद २९९
बाद क्रम : १-१०३, २-११३, ३-११३, ४-२४०, ५-२९८
गोलंदाजी : झहीर खान १६-२-४६-०, मोहम्मद शमी १९-२-६२-१, इशांत शर्मा २३-७-७६-०, रवींद्र जडेजा ३७-९-८७-४, रोहित शर्मा ९.५-१-२२-०.
कॅलिसला गार्ड ऑफ ऑनर
कसोटी कारकीर्दीतील अखेरचा सामना खेळणाऱ्या जॅक कॅलिसला भारतीय खेळाडूंनी ‘गार्ड ऑफ ऑनर’ मानवंदना दिली. दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात हशिम अमला बाद झाल्यानंतर जॅक कॅलिसचे मैदानावर आगमन झाले. भारतीय खेळाडू तसेच मैदानावरील पंच स्टीव्ह डेव्हिस आणि रॉड टकर यांनी क्रिकेटला अतुलनीय योगदानाबद्दल कॅलिसला मानवंदना दिली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-12-2013 at 03:32 IST

संबंधित बातम्या