एखादे षटक सामन्याचा नूर पालटवू शकते, याचा प्रत्यय शनिवारी भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पुन्हा एकदा क्रिकेट विश्वाने अनुभवला. एका षटकात तब्बल ३० धावा लुटत जेम्स फॉल्कनरने भारताच्या तोंडचा विजयाचा घास हिरावून घेतला आणि ऑस्ट्रेलियाला हा सामना आश्चर्यकारकरीत्या जिंकवून दिला. फॉल्कनरने तडाखेबंद नाबाद ६४ धावांच्या खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाला ४ विकेट्स आणि तीन चेंडू राखून विजय मिळवता आला. अ‍ॅडम व्होग्सनेही नाबाद अर्धशतकी खेळी साकारत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची नाबाद शतकी खेळी मात्र व्यर्थ ठरली. या विजयानिशी ऑस्ट्रेलियाने सात एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.
ऑस्ट्रेलियाला ६८ धावांची सलामी मिळाल्यानंतर त्यांची ३ बाद ८८ अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर कर्णधार जॉर्ज बेली (४३) आणि अ‍ॅडम व्होग्स यांनी संघाची पडझड थांबवली आणि दीडशे धावांचा टप्पा गाठून दिला. बेली बाद झाल्यावर एक बाजू व्होग्सने सावरून धरली, पण सामन्याचे चित्र पालटले ते जेम्स फॉल्करनने. इशांत शर्माच्या ४८व्या षटकात फॉल्कनरने चार षटकार, एक चौकार आणि एका दुहेरी धावेच्या जोरावर ३० धावांची लयलूट केली व हेच षटक निर्णायक ठरले.  त्यानंतरच्या षटकात मात्र आर. अश्विनने ५ धावा दिल्यामुळे अखेरच्या षटकामध्ये ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ९ धावांची गरज होती. अखेरच्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर फॉल्कनरने विजयाचा षटकार खेचत संघाला अटीतटीची लढत जिंकवून दिली. फॉल्कनरने अवघ्या २९ चेंडूंमध्ये २ चौकार आणि ६ षटकारांच्या जोरावर नाबाद ६४ धावांची अफलातून खेळी साकारली. त्याला व्होग्सने ७ चौकारांच्या जोरावर ७६ धावांची खेळी साकारत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या दोघांनी सातव्या विकेटसाठी ९१ धावांची अभेद्य भागीदारी रचली.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीला पाचारण केले आणि त्यांच्या गोलंदाजांनी अप्रतिम मारा केला. दुसऱ्या सामन्यात ३६० धावांचे आव्हान स्वीकारताना विजयाचा पाया रचणाऱ्या रोहित शर्मा (११) आणि शिखर धवन (८) या भारताच्या सलामीवीरांना भारताने ३७ धावांमध्ये गमावले. त्यानंतर तेराव्या षटकातील पाचव्या आणि सहाव्या चेंडूंवर जॉन्सनने सुरेश रैना (१७) आणि युवराज सिंग (०) यांना बाद करत भारताला दुहेरी धक्के दिले. त्यानंतर काही वेळ विराट कोहली आणि धोनी यांनी पाचव्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी रचली. कोहलीने या वेळी ९ चौकारांच्या जोरावर ६८ धावांची खेळी साकारली. कोहली बाद झाल्यावर भारतीय संघ पुन्हा अडचणीत सापडला आणि धोनी संघासाठी संकटमोचक ठरला.
‘कॅप्टन कूल’ अशी बिरुदावली सार्थ ठरवणाऱ्या धोनीने या सामन्यात शांत, संयमी, संयत फलंदाजी केली. एकदा स्थिरस्थावर झाल्यावर त्याने कसलीच तमा बाळगली नाही, आपल्या पोतडीतील फटक्यांचे एकामागून एक नजराणे त्याने पेश केले, त्याचबरोबर तळातील फलंदाजांना साथीला घेत त्याने संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. ६ बाद १५४ अशा अवस्थेतून त्याने संघाला तीनशे धावांचा पल्ला आपल्या शानदार नाबाद शतकी खेळीच्या जोरावर गाठून दिला. आर. अश्विनबरोबर (२८) त्याने सातव्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी रचली.
 धोनीने १२१ चेंडूंत १२ चौकार आणि ५ खणखणीत षटकारांच्या जोरावर नाबाद १३९ धावांची खेळी साकारत सामन्याचे पारडे भारताच्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न केला. फॉल्कनरच्या अखेरच्या षटकात धोनीने २ षटकार आणि २ चौकार फटकावत २१ धावांची वसुली
केली.
धावफलक
भारत : रोहित शर्मा झे. फिन्च गो. वॉटसन ११, शिखर धवन झे. हॅडिन गो. मकाय ८, विराट कोहली झे. हॅडिन गो. मॅक्सवेल ६८, सुरेश रैना झे. वॉटसन गो. जॉन्सन १७, युवराज सिंग झे. हॅडिन गो. जॉन्सन ०, महेंद्रसिंग धोनी नाबाद १३९, रवींद्र जडेजा झे. हॅडिन गो. जॉन्सन २, आर. अश्विन झे. हॅडिन गो. जॉन्सन २८, भुवनेश्वर कुमार झे. बेली गो. फॉल्कनर १०, आर. विनय कुमार धावचीत ०, इशांत शर्मा ०, अवांतर (लेग बाइज १३, वाइड ७) २०, एकूण ५० षटकांत ९ बाद ३०३.
बाद क्रम : १-१४, २-३७, ३-७६, ४-७६, ५-१४८, ६-१५४, ७ -२३०, ८-२६७, ९-२९९.
गोलंदाजी : मिचेल जॉन्सन १०-१-४६-४, क्लिंट मकाय १०-०-४९-१, शेन वॉटसन ८-०-७४-१, जेम्स फॉल्कनर १०-०-६५-१, झेव्हियर डोहर्टी १०-०-४५-०, अ‍ॅडम व्होग्स १-०-३-०, ग्लेन मॅक्सवेल १-०-८-१.
ऑस्ट्रेलिया : फिलीप ह्य़ुजेस झे. धोनी गो. विनय कुमार २२, अ‍ॅरोन फिन्च पायचीत गो, इशांत ३८, शेन वॉटसन पायचीत गो. जडेजा ११, जॉर्ज बेली पायचीत गो. विनय कुमार ४३, अ‍ॅडम व्होग्स नाबाद ७६, ग्लेन मॅक्सवेल धावचीत ३, ब्रॅड हॅडिन झे. जडेजा गो. भुवनेश्वर कुमार २४, जेम्स फॉल्कनर नाबाद ६४, अवांतर (लेग बाइज १४, वाइड ९) २३, एकूण ४९.३ षटकांत ६ बाद ३०४.
बाद क्रम  १-६८, २-८२, ३-८८, ४-१७१, ५-१७४, ६-२१३.
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार १०-१-५-१, विनय कुमार ८.३-०-५०-२, इशांत शर्मा ८-१-६३-१, रवींद्र जडेजा १०-०-३१-१, युवराज सिंग ३-०-२०-०, आर. अश्विन ९-०-५८-०, विराट कोहली १-०-१८-०.
सामनावीर : जेम्स फॉल्कनर.