जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूचे आव्हान संपुष्टात आले. जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या आकाने यामागुची हिने तुला पराभवाची चव चाखायला भाग पाडले. विशेष म्हणजे यामागुचीकडून सिंधू गेल्या ६ दिवसांच्या कालावधीत दोन वेळा पराभूत झाली. सध्या सुरु असलेल्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सिंधू उपांत्यपूर्व फेरीत यामागुचीकडून १८-२१, १५-२१ अशा सरळ गेममध्ये पराभूत झाली. या आधी गेल्या रविवारी इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही यामागुचीने सिंधूला पराभूत केले होते.

आज झालेल्या सामन्यात सिंधूला इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी होती, पण यामागुचीने सामन्यात सुरुवातच दमदार केली. पहिला गेम काहीसा चुरशीचा झाला. पण त्यात यामागुची सरस ठरली. दुसऱ्या गेममध्ये सिंधू पुनरागमन करेल असा विश्वास चाहत्यांना होता, पण त्यांची घोर निराशा झाली. सिंधू दुसऱ्या गेममध्ये पहिल्या गेमपेक्षा वाईट प्रकारे पराभूत झाली. त्यामुळे तिचा या स्पर्धेतील प्रवास संपला.

कालच्या सामन्यात भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू हिने जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. पाचव्या मानांकित सिंधूने सुमारे तासभर चाललेल्या सामन्यात जपानच्या आया ओहोरी हिला ११-२१, २१-१०, २१-१३ असे पराभूत केले. सिंधूला पहिला गेम गमवावा लागला पण त्यानंतर तिने दमदार कमबॅक केला व सामना जिंकला होता.