पीटीआय, लिव्हरपूल

एकीकडे भारतीय पुरुष बॉक्सिंगपटूंकडून निराशा होत असताना दुसरीकडे जॅस्मिन लम्बोरिया (५७ किलो) आणि मीनाक्षी हुडा (४८ किलो) या दोन महिला खेळाडूंनी जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत विजेतेपद मिळविण्याची कामगिरी केली. जागतिक स्पर्धेत विजेतेपद मिळविणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला बॉक्सिंगपटू ठरल्या.

भारताच्या महिला बॉक्सिंगपटूंनी संपूर्ण स्पर्धेत प्रतिस्पर्ध्यांवर निर्विवाद वर्चस्व राखताना आपल्या मोहिमेची यशस्वी सांगता केली. या कामगिरीने दोघींचे नाव भारताच्या क्रीडा आणि बॉक्सिंग इतिहासात ‘सुवर्ण’ अक्षरांनी जोडले जाईल.

जॅस्मिन ही पहिली विजेती खेळाडू ठरली. तिने ५७ किलो वजनी गटातील लढतीत पॅरिस ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पोलंडच्या ज्युलिया झेरेमेटा हिला पराभूत केले. पाच फेऱ्यांमध्ये जॅस्मिनचे ३०-२७, २९-२८, ३०-२७, २८-२९, २९-२८ असे वर्चस्व राहिले होते. अत्यंत संघर्षपूर्ण झालेल्या लढतीत पंचांनी जॅस्मिनच्या खेळाचे अचूक परीक्षण करताना तिच्या बाजूने ४-१ असा कौल दिला.

जॅस्मिनपाठोपाठ मीनाक्षीने रविवारी पॅरिस ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती कझाकस्तानची नाझीम किझाईबे हिला ४८ किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत पराभूत केले. पंचांनी मीनाक्षीच्या बाजूने ४-१ असा कौल दिला.

दरम्यान, ऑलिम्पिकचा भाग नसलेल्या ८० किलोपेक्षा अधिक वजनी गटात नूपुर शेरॉन हिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पूजा राणी (८० किलो) कांस्यपदकाची मानकरी ठरली. भारताने या स्पर्धेत दोन सुवर्ण, एक रौप्य, एक कांस्य अशी चार पदके मिळविली. परदेशातील स्पर्धेत भारताची ही आजवरची सर्वोत्तम कामगिरी ठरली.

२४ वर्षीय जॅस्मिनने सातत्याने प्रगती करत चौथ्या प्रयत्नात सुवर्णपदकाचे स्वप्न साकार केले. ऑलिम्पिक अंतिम फेरीत लिन यु टिंगकडून पराभूत झालेली सी झेरमेटा ही रिंगमध्ये वेगवान आणि अचूक होती. तिने पदलालित्याचा सुरेख वापर करून जॅस्मिनला चांगले झुंजवले. जॅस्मिनची पोहोच लांबवर असूनही तिला फारशी प्रगती करता येत नव्हती. अशा वेळी पहिली फेरी गमावल्यावर दुसऱ्या फेरीपासून जॅस्मिनने लय मिळवली. झेरमेटाच्या लयीशी जुळवून घेत तिने दोघींमधील अंतर नियंत्रित ठेवले. गुण मिळविण्याच्या इराद्याने जेव्हा जेव्हा झेरमेटा पुढे येत होती, तेव्हा तेव्हा जॅस्मिनचे अचूक पंचेस झेरमेटाच्या शरीरावर नेमके बसत होते. या कुशल रणनीतीला जॅस्मिनने नंतर बचावाची सुरेख जोड देत पंचांना आपल्या बाजूने कौल देण्यास जणू भाग पाडले.

मीनाक्षीने अंतिम लढतीत शारीरिक क्षमतेचा र्पू्ण फायदा करून घेतला. जोरदार पंचेस आणि जॅब्स मारून मीनाक्षी झटकन बाजूला होत होती. तिच्यापेक्षा अधिक अनुभवी असलेली ३१ वर्षीय नाझिम आक्रमकतेने पुढे येत होती. दुसऱ्या फेरीत नाझिमच्या पवित्र्यातील बदल लक्षात घेत मीनाक्षी तिसऱ्या फेरीत आक्रमक झाली. ती पुढे सरसावून खेळत होती. यामुळे अनुभवी नाझिमला आपला लौकिक राखता आला नाही.

नूपुरला रौप्यपदक

जॅस्मिनपाठोपाठ नूपुर अंतिम लढतीसाठी रिंगणात उतरली होती. नूपुरला उंचीचा पुरेसा फायदा करून घेता आला नाही. तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम असलेल्या पोलंडच्या काझमार्स्का हिच्या फटक्यांनी अनेकदा नूपुरच्या शरीराचा अचूक वेध घेतला. काझमार्स्का पुढे येऊन नूपुरला आव्हान देत होती. मात्र, नूपुर तिच्यावर प्रतिआक्रमण करण्यास कचरत असल्याचे जाणवले. अगदी अखेरच्या क्षणी काझमार्स्काचा अप्पर कट नूपुरला निष्प्रभ करून गेला. यानंतर पंचांनी ३-२ असा कौल देत काझमार्स्काला विजयी घोषित केले. पूजाला उपांत्य फेरीत स्थानिक खेळाडू एमिली असक्विथाकडून पराभव पत्करावा लागला. एमिलीच्या वर्चस्वपूर्ण खेळामुळे पंचांनी तिच्या बाजूने ४-१ असा निर्णय दिला.