Jasprit Bumrah Record in IND vs ENG 1st Test: भारत वि. इंग्लंडमधील पहिल्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह भारताचा यशस्वी गोलंदाज ठरला आहे. बुमराहने हेडिंग्ले कसोटीच्या पहिल्या डावात एकट्याने ३ विकेट्स घेतले. बुमराहने पहिल्याच षटकात सलामीवीर जॅक क्रॉलीला झेलबाद केलं. यानंतर त्याने अर्धशतक झळकावत फटकेबाजी करणाऱ्या बेन डकेटला बाद केलं. हे दोन विकेट घेताच बुमराहने मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. संपूर्ण आशिया खंडात बुमराह सर्वाेत्कृष्ट गोलंदाज ठरला आहे.
जसप्रीत बुमराहने त्याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर अनेक विकेट घेतले आहेत. यासह त्याने वेगवेगळे विक्रम आपल्या नावे केले आहेत. बुमराहने हेडिंग्ले कसोटीत आपल्या गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडच्या फलंदाजांना मोठी खेळी खेळू दिली नाही. बुमराहने जॅक क्रॉली, ऑली पोप यांना बाद केल्यानंतर इंग्लंडचा मोठा फलंदाज जो रूटला झेलबाद करत दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस भारताला दिलासादायक विकेट मिळवून दिली.
बुमराह हेडिंग्ले कसोटीतील विकेट्सह दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यासारख्या SENA देशांमध्ये सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा आशियाई गोलंदाज ठरला आहे. बुमराहने हा विक्रम आपल्या नावे करताच पाकिस्तान त्याने पाकिस्तानच्या वसीम अक्रमला मागे टाकत पहिलं स्थान गाठलं आहे. बुमराहने सेना देशांमध्ये आता सर्वाधिक १४७ विकेट्स घेतल्या आहेत.
बुमराहने सेना देशांमध्ये ६० डावांमध्ये १४७ विकेट्स घेतल्या आहेत. तर अक्रमने ५५ डावांमध्ये १४६ विकेट्स घेतले होते. या दोघांनंतर माजी भारतीय कर्णधार आणि फिरकीपटू अनिल कुंबळे आहेत, ज्यांनी ६७ डावांमध्ये १४१ विकेट घेतले. भारताचा इशांत शर्मा ७१ डावांमध्ये १३० विकेट्सह चौथ्या आणि मोहम्मद शमी ६३ डावांमध्ये १२३ विकेटसह पाचव्या स्थानावर आहे.
या यादीत पुढे श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरनच्या नावे ३४ डावात १२० विकेटस आहेत. भारताचा झहीर खान ५३ डावांत ११९ विकेट्ससह पुढच्या स्थानी आहे. तर कपिल देव यांच्या नावे ६२ डावांत ११७ विकेट आहेत.
बुमराहने सेना देशांमध्ये किती विकेट घेतले?
बुमराहने ऑस्ट्रेलियामध्ये आतापर्यंत २३ डावांमध्ये गोलंदाजी करत ६४ विकेट घेतले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर बुमराह सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेत १५ डावांमध्ये ३८ विकेट, इंग्लंडमध्ये १६ डावांमध्ये ३९ विकेट आणि न्यूझीलंडमध्ये चार डावांमध्ये सहा विकेट घेतले आहेत. बुमराहने २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी पदार्पण केले. तेव्हापासून तो टीम इंडियाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि सध्या तो कसोटीतील नंबर वन गोलंदाज आहे. त्याने कसोटीत एकूण २०७ विकेट्स घेतल्या आहेत.