Jasprit Bumrah Bowled Brydon Carse Video: लॉर्ड्स कसोटीत दुसऱ्या डावात भारताच्या गोलंदाजी विभागाने उत्कृष्ट गोलंदाजी केली. इंग्लंडच्या फलंदाजांना फार काळ मैदानावर टिकू दिलं नाही आणि झटपट विकेट घेतल्या. भारताच्या जवळपास प्रत्येक गोलंदाजाने विकेट पटकावल्या आहेत. बुमराहने दुसऱ्या डावात चांगली गोलंदाजी केली पण त्याच्या खात्यात विकेट नाही असं होणं फारच अशक्य आहे. बुमराहने दुसऱ्या डावात ३ विकेट्स घेतल्या आहेत.
जसप्रीत बुमराहने पहिल्या डावात पाच विकेट्स घेत भेदक गोलंदाजी केली होती. पण दुसऱ्या डावात बुमराहने नेहमीप्रमाणे किफायतशीर गोलंदाजी केली, मात्र विकेट मिळवली नव्हती. वॉशिंग्टन सुंदरने इंग्लंडच्या मोठ्या फलंदाजांना बाद केलं आणि तितक्यात खालची फलंदाजी फळी सुरू होताच बुमराहला गोलंदाजीसाठी पाचारण केलं. बुमराहने झटपट २ विकेट्स घेत इंग्लंडचा डाव आटोपण्यात मोठी भूमिका बजावली.
जसप्रीत बुमराह त्याच्या वेगवान गोलंदाजीसह भेदक यॉर्करसाठी देखील ओळखला जातो. बुमराहने इंग्लंडविरूद्ध दुसऱ्या डावात असाच कमालीचा यॉर्कर टाकत संघाला विकेट मिळवून दिली. बुमराह ५६व्या षटकात गोलंदाजीला आला. समोर इंग्लंडचा गोलंदाज ब्रायडन कार्स होता. कार्सने पहिल्या डावात भारताविरूद्ध अर्धशतक झळकावलं होतं. जे त्याचं कसोटी कारकिर्दीतील पहिलं अर्धशतक होतं.
बुमराहने मात्र कार्सला दुसऱ्या डावात फार काळ मैदानावर टिकू दिलं नाही. कार्स पहिल्याच चेंडूवर स्ट्राईकवर होता. बुमराहने पहिलाच चेंडू कमालीचा यॉर्कर टाकला. चेंडू थेट कार्सच्या पायात पडला आणि त्याने बॅट फिरवण्याआधीच स्टम्पवर जाऊन आदळला. कार्स बुमराहचा चेंडू समजण्याआधीच बेल्स विखुरल्या होत्या. कार्सही मैदानावर बॅट टेकवत निराश होत माघारी परतला. बुमराहच्या या विकेटचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ब्रायडन कार्सच्या विकेटनंतर बुमराहने त्याच्या स्पेलमधील पुढील षटकात ख्रिस वोक्सला क्लीन बोल्ड करत त्याला चकित केलं. बुमराहच्या दोन विकेट्ससह टीम इंडियाला इंग्लंडचा डाव सावरण्यात मदत झाली. वॉशिंग्टन सुंदरने शोएब बशीरची अखेरची विकेट घेत इंग्लंडचा डाव १९२ धावांवर आटोपला. यजमान संघाने आता भारताला विजयासाठी १९३ धावांचं आव्हान दिलं आहे.