देवेंद्र पांडे, इंडियन एक्सप्रेस
Jasprit Bumrah Informs Decision About Playing in Asia Cup: भारतीय संघाचा उत्कृष्ट गोलंदाज जसप्रीत बुमराह इंग्लंड दौऱ्यापासूनच चर्चेत आहे. त्याच्या फिटनेस आणि वर्कलोड मॅनेजमेंटवर सतत चर्चा सुरू आहे. इंग्लंडमध्ये ५ पैकी ३ कसोटी सामने खेळल्यामुळे त्याच्यावर टीकादेखील होत आहे आणि तो आशिया कपमध्ये सहभागी होणार की नाही हा प्रश्न सातत्याने समोर येत आहे. यावर आता बुमराहने स्वतः आपला निर्णय दिला आहे.
अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील वरिष्ठ निवड समितीची १९ ऑगस्टला मुंबईत बैठक होणार असून त्यात आशिया चषकसाठी १५ सदस्यीय संघाची निवड होण्याची शक्यता आहे. आशिया कप ९ ते २८ सप्टेंबर दरम्यान यूएईमध्ये टी-२० स्वरूपात खेळवला जाईल. भारतीय संघ आशिया कपसाठी वेळेपूर्वी संयुक्त अरब अमिराती (यूएई) ला रवाना होईल.
जसप्रीत बुमराह आशिया कप खेळणार की नाही?
जसप्रीत बुमराहने आगामी आशिया चषक २०२५ साठी उपलब्ध असल्याचं बीसीसीआयला कळवलं आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार बुमराहने काही दिवसांपूर्वी निवडकर्त्यांशी चर्चा करून आशिया चषक खेळणार असल्याची माहिती दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “बुमराहने निवडकर्त्यांना कळवलं आहे की तो आशिया चषक संघाच्या निवडीसाठी उपलब्ध असेल. निवड समितीची पुढील आठवड्यात आशिया चषक संघनिवडीसाठी बैठक होणार आहे. ओव्हल येथे होणाऱ्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीसाठी वर्कलोडमुळे बुमराहला कसोटी संघातून वगळण्यात आले होते. इंग्लंड दौऱ्यावर तो फक्त ३ कसोटी सामने खेळला. या तीन सामन्यांमध्ये त्याने २ वेळा ५ बळी घेतले.
आशिया चषक २०२५ टी-२० फॉरमॅटमध्ये
आशिया कप टी-२० फॉरमॅटमध्ये खेळला जाईल, त्यामुळे बुमराहला मोठे स्पेल टाकावे लागणार नाहीत. इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेला अखेरचा कसोटी सामना आणि आशिया चषक सुरू होण्यामध्ये सुमारे ४० दिवसांचं अंतर आहे. २०२४ च्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर बुमराहने भारतासाठी एकही टी-२० सामना खेळलेला नाही. या अंतिम सामन्यात बुमराहने १८ धावा देऊन २ बळी घेतले. आशिया चषकमध्ये भारताला १० सप्टेंबर रोजी युएईविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. जर बुमराह हा सामना खेळला तर तो ४३७ दिवसांनंतर भारतासाठी टी-२० सामना खेळेल.
भारतीय संघ आशिया चषकसाठी लवकर युएईला रवाना होणार
भारतीय संघ आशिया चषकसाठी लवकर युएईला रवाना होणार आहे. बहुतेक खेळाडू कोणत्याही सराव सामन्याशिवाय युएईसाठी रवाना होतील. बीसीसीआयने संघ व्यवस्थापनाला विचारलं होतं की त्यांना बेंगळुरूमध्ये सरावासाठी कॅम्प करायचा आहे का? पण संघ व्यवस्थापनाच्या मते खेळाडूंना परिस्थितीशी जुळवून घेता यावे म्हणून लवकर युएईला रवाना होणं सोयीचं ठरेल. “इथे कॅम्पिंग करण्याऐवजी, संघ तीन-चार दिवस आधी रवाना होईल जेणेकरून त्यांना स्पर्धा सुरू होण्यापूर्वी चांगला सराव करता येईल.”, अशी माहिती सूत्रांनी दिली.