इंग्लंड दौऱ्यावर फक्त तीन कसोटी सामने खेळणाऱ्या जसप्रीत बुमराहच्या वर्कलोड मॅनेजमेंटवर जोरदार चर्चा सुरू आहे. जगातील नंबर-१ वेगवान गोलंदाजावर बरीच टीका होत आहे. दरम्यान, माजी भारतीय कर्णधाराने भारतीय संघ व्यवस्थापन आणि निर्णय घेणाऱ्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तर मुकेश अंबानींचा उल्लेख करत सल्ला दिला आहे.

ऑस्ट्रेलियाविरूद्ध बॉर्डर गावस्कर ट्रॉफीदरम्यान जसप्रीत बुमराहच्या पाठीला दुखापत झाली. यानंतर बुमराहच्या वर्कलोड मॅनेजमेंटचा विचार करता त्याने इंग्लंड दौऱ्यावरील पाचपैकी ३ सामने खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. या मुद्दयावरून सध्या चर्चांना उधाण आहे.

भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या मते भारतीय संघ व्यवस्थापनाने बुमराहला आयपीएल २०२५मध्ये खेळू नये, असं सांगायला हवं होतं. यामुळे तो भारत आणि इंग्लंडमधील पाच कसोटी सामन्यांच्या महत्त्वाच्या मालिकेसाठी तंदुरुस्त राहिला असता. दिलीप वेंगसरकर इतकंही म्हणाले की, ते जर निवडकर्ता असते तर त्यांनी मुंबई इंडियन्स संघाचे मालक मुकेश अंबानी यांच्याशीदेखील चर्चा केली असती.

दिलीप वेंगसरकर बुमराहच्या वर्कलोडबाबत अंबानींचा उल्लेख करत काय म्हणाले?

वेंगसरकर म्हणाले, “भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचं महत्त्व आणि बुमराहची दुखापत लक्षात घेऊन, बीसीसीआय, निवडकर्ते आणि भारतीय संघ व्यवस्थापनाने त्याला आयपीएल २०२५ खेळू नये असा सल्ला द्यायला हवा होता. या महत्त्वाच्या मालिकेसाठी बुमराह फिट असणं संघासाठी खूप महत्त्वाचं होतं.

“वेंगसरकर पुढे म्हणाले, जर मी भारताचा मुख्य निवडकर्ता असतो, तर मी मुकेश अंबानी (मुंबई इंडियन्सचे मालक) आणि बुमराह यांना सांगितलं असतं की इंग्लंड मालिकेसाठी बुमराहने आयपीएल खेळू नये किंवा कमी सामने खेळावे. मला खात्री आहे की ते यासाठी तयार झाले असते.”

आयपीएलमध्ये केलेल्या धावा आणि विकेट्स कोणाच्या लक्षात राहतात? पण या मालिकेत मोहम्मद सिराजची भन्नाट गोलंदाजी, शुबमन गिल, केएल राहुल, यशस्वी जैस्वाल आणि ऋषभ पंत यांची तडाखेबाज फलंदाजी, तसेच वॉशिंग्टन सुंदरची अष्टपैलू कामगिरी ही कायम लक्षात राहणारी आहे. अशी कसोटी मालिका चार वर्षांतून एखाद्यावेळीच होते. माझ्या मते, आता २०२७ पर्यंत भारत पुन्हा पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार नाही. ही मालिका खरोखरच संस्मरणीय होती. बुमराह सर्व सामने खेळला असता, तर कदाचित भारताने मालिका जिंकली असती.”

भारत आणि इंग्लंड कसोटी मालिका ही २-२ अशी बरोबरीत राहिली. भारताने बर्मिंगहम आणि ओव्हल कसोटी सामना जिंकला, तर इंग्लंडने लीड्स आणि लॉर्ड्स कसोटीत विजय मिळवला आणि मँचेस्टर कसोटी सामना अनिर्णित राहिला.