दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर भारताच्या महिला कुस्तीपटूंसह अनेक अॅथलिट्स आंदोलन करत आहेत. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर भारताच्या पदकविजेत्या महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी या कुस्तीपटूंनी केली आहे. एकीकडे ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पी. टी. उषा यांनी भारताची प्रतिमा डागाळल्याचा आरोप या महिला कुस्तीपटूंवर केला असताना दुसरीकडे विनेश फोगाटनं कुणीही पाठिंबा देत नसल्याचं सांगत भारतीय क्रीडाविश्वावर परखड सवाल उपस्थित केले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर भारताचा ‘गोल्डन बॉय’ अर्थात सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा यानं आंदोलनकर्त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

नीरज चोप्राचं ट्वीट

नीरज चोप्रानं महिला कुस्तीपटूंना पाठिंबा देणारं ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यानं कुस्तीपटूंना द्यावा लागणारा लढा पाहून वेदना होत असल्याचं नीरज चोप्रानं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. “आपले अॅथलिट रस्त्यावर उतरून न्यायाची मागणी करत असल्याचं पाहून मला वेदना होत आहेत. आपल्या महान देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आणि देशाला गर्व वाटण्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतले आहेत”, असं नीरज चोप्रानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

“एक देश म्हणून देशातल्या प्रत्येक नागरिकाचं सार्वभौमत्व आणि मान-सन्मान राखण्यासाठी आपण सगळे जबाबदार आहोत. मग ती व्यक्ती कुणी सामान्य नागरिक असो किंवा अॅथलिट”, असंही नीरज चोप्रानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

“जे घडतंय, ते कधीच घडायला नको होतं”

दरम्यान, सध्या जे घडतंय, ते कधीच घडायला नको होतं, असं नीरज चोप्रानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. “हा एक फार संवेदनशील विषय आहे. हे प्रकरण अत्यंत पारदर्शी पद्धतीने हाताळलं गेलं पाहिजे. संबंधित यंत्रणांनी यावर तातडीने पावलं उचलून न्याय दिला जाईल याची खात्री केली पाहिजे”, असंही नीरज चोप्रानं नमूद केलं आहे.

“आज क्रिकेटपटू शांत का आहेत? त्यांना कसली भीती आहे?” कुस्तीपटू विनेश फोगाटचा उद्विग्न सवाल!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय म्हणाली होती विनेश फोगाट?

विनेश फोगाटनं इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना तिच्या भावनांना वाट मोकळी करून दिली होती. तसेच, देशभरातील क्रीडापटूंना आवाहन केलं होतं. “मी आणि बजरंग पुनियानं अनेक खुली पत्रं लिहिली, व्हिडीओ पोस्ट केले ज्यात इतर खेळाडूंना बोलण्याची विनंती केली होती. पण त्यांना नेमकी कशाची भीती वाटतेय हे आम्हाला माहिती नाही. मी समजू शकते की त्यांना स्पॉन्सरशिप गमावण्याची किंवा ब्रँड एंडॉर्समेंटचे करार मोडण्याची काळजी असेल. कदाचित त्यामुळेच त्यांना आंदोलन करणाऱ्या खेळाडूंशी नाव जोडलं जाण्याची भीती असेल. पण त्याचं मला दु:ख होतंय”, अशा शब्दांत विनेश फोगाटनं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.