युजीन : भारताची भालाफेकपटू अन्नू राणीने गुरुवारी अखेरच्या प्रयत्नात ५९.६० मीटर अंतरावर भाला फेकून जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
अन्नूने पहिल्या प्रयत्नात सदोष फेक केली, तर दुसऱ्या प्रयत्नात ५५.३५ मीटर अंतर गाठले. त्यामुळे तिचे आव्हान पात्रता फेरीत संपुष्टात येण्याची चिन्हे होती. परंतु तिसऱ्या आणि अखेरच्या प्रयत्नात तिने ५९.६० मीटर अंतर गाठले. जे यंदाच्या हंगामातील तिच्या ६३.८२ मीटर या सर्वोत्तम कामगिरीइतके नसले, तरी अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी पुरेसे होते.
अन्नूला ब-गटाच्या पात्रता फेरीत पाचवा क्रमांक तर दोन्ही गटांमध्ये मिळवून आठवा क्रमांक मिळाला. २९ वर्षीय राष्ट्रीय विक्रमवीर अन्नूला ६० मीटर अंतराचा टप्पा गाठण्यात अपयश आले. आता भारतीय प्रमाणवेळेनुसार, शनिवारी सकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी होणाऱ्या अंतिम फेरीकडे क्रीडारसिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
पात्रता फेऱ्यांमधील दोन्ही गटांतून ६२.५० मीटर अंतर गाठणाऱ्या तीन खेळाडूंसह सर्वोत्तम १२ जणींना अंतिम फेरीत स्थान मिळवता आले. यंदाच्या हंगामात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या अमेरिकेच्या मॅगी मॅलोनेला अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. तिला ब-गटात १२वे आणि एकंदर २२व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. ऑस्ट्रेलियाच्या गतविजेत्या केल्सी-ली-बार्बरने अंतिम फेरीत स्थान पक्के करताना ६१.२७ मीटर ही पाचव्या क्रमांकावरील सर्वोत्तम कामगिरी साकारली.
अन्नूने तिसऱ्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत सहभागी होताना सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत स्थान मिळवण्याचा पराक्रम दाखवला आहे. २०१९मध्ये दोहा येथे झालेल्या जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ६१.१२ मीटर अंतरावर भाला फेकणाऱ्या अन्नूला आठवा क्रमांक मिळाला होता. त्याआधी, २०१७मध्ये लंडन येथे झालेल्या जागतिक स्पर्धेच्या पात्रता फेरीत १० वा क्रमांक मिळवणाऱ्या अन्नूला अंतिम फेरी गाठता आली नव्हती.
नीरजच्या कामगिरीकडे लक्ष
ऑलिम्पिक विजेत्या नीरज चोप्राच्या कामगिरीकडे शुक्रवारी सर्वाचे लक्ष असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ५.३५ वाजता पुरुषांच्या भालाफेक क्रीडा प्रकाराला प्रारंभ होणार असून, पात्रता फेरीत नीरजचा अ-गटात समावेश आहे. टोक्यो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता चेक प्रजासत्ताकचा जॅकूब व्हॅडलेच आणि २०१२च्या लंडन ऑलिम्पिकचा सुवर्णपदक विजेता त्रिनिदाद अँड टोबॅगोचा केशॉर्न वॉलकॉट यांचाही या गटात समावेश आहे. ग्रेनाडाचा गतविश्वविजेता अँडरसन पीटर्सचा ब-गटात समावेश आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी होणार आहे.
पारुल अपयशी
महिलांच्या ५००० मीटर शर्यतीत पारुल चौधरीला उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले. १५:५४.०३ मिनिटे वेळ नोंदवणाऱ्या पारुलला दुसऱ्या क्रमांकाच्या शर्यतीत १७वा क्रमांक, तर एकंदर ३१वा क्रमांक मिळाला. पारुलने यंदाच्या हंगामात १५:३९.७७ मि. आणि कारकीर्दीतील १५:३६.०३ अशी सर्वोत्तम वेळ नोंदवली होती.