नीरज चोप्रा, भालाफेकपटू
टोक्यो ऑलिम्पिकमधील ऐतिहासिक सुवर्ण कामगिरीनंतर भालाफेकपटू नीरज चोप्राला आता पॅरिसमध्ये होणाऱ्या स्पर्धेत पुन्हा एकदा सोनेरी यश संपादन करण्याचे वेध लागले आहेत. २०२०च्या टोक्यो ऑलिम्पिकपाठोपाठ नीरजने २०२३च्या जागतिक अजिंक्यपद अॅथलेटिक्स स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले होते. तसेच त्याने डायमंड लीग आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतही भालाफेकीतील आपले वर्चस्व सिद्ध केले. त्यामुळे साहजिकच यंदा पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पदकाची सर्वाधिक अपेक्षा नीरजकडूनच आहे.
कच्चे दुवे
● नीरजला गेल्या काही काळात दुखापतींचा सामना करावा लागला आहे. उजव्या खांद्याचे स्नायू, तसेच मांडीला जोडणारे स्नायू ताणले गेल्याने नीरजच्या तंदुरुस्तीवर परिणाम झाला आहे.
● नीरजला या महिन्यात डायमंड लीगच्या पॅरिस टप्प्यात खेळता आले नव्हते. पुढे जाऊन त्याने ही स्पर्धा माझ्या वेळापत्रकाचा भागच नव्हती असे स्पष्टीकरण दिले. मात्र, तंदुरुस्तीच्या चिंतेमुळे नीरजला या वर्षी केवळ तीन स्पर्धांत खेळता आले आहे.
हेही वाचा >>>Smriti Mandhana : नॅशनल क्रशने जिंकली चाहत्यांची मनं, आपल्या स्पेशल फॅनला गिफ्ट केली खास गोष्ट, पाहा VIDEO
बलस्थाने
● मोठ्या स्पर्धांमध्ये दडपणाखाली संयम राखून दमदार कामगिरी करण्यासाठी आवश्यक मानसिक कणखरता आणि मोक्याच्या क्षणी खेळ उंचावण्याची क्षमता, हीच नीरजची खरी ताकद आहे.
● नीरजला अद्याप ९० मीटरचे अंतर गाठता आले नसले, तरी मोठ्या स्पर्धांमध्ये प्रतिस्पर्ध्यांपेक्षा एक पाऊल पुढे राहण्यात त्याने कायमच यश मिळवले आहे. ऑलिम्पिक आणि जागतिक जेतेपदावरून हे सिद्धही झाले आहे.
कोणाकडून आव्हान?
नीरजने जवळपास सर्वच मोठ्या स्पर्धांमध्ये सुवर्ण कामगिरी केली असली, तरी त्याला ९० मीटरचे अंतर कधीही गाठता आलेले नाही. २०२२ मध्ये स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये त्याने ८९.९४ मीटरवर भालाफेक केली होती, जी त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. टोक्योमध्ये त्याने ८७.५८ मीटर अंतरासह सुवर्णपदक पटकावले होते. यंदा त्याच्यासमोर ९० मीटरचे अंतर पार करणारा सर्वांत युवा भालाफेकपटू जर्मनीचा १९ वर्षीय मॅक्स डेहनिंग, तसेच जर्मनीचाच ज्युलियन वेबर, पाकिस्तानचा अर्शद नदीम, ग्रेनाडाचा अँडरसन पीटर्स, चेक प्रजासत्ताकचा याकुब वाडलेज यांचे आव्हान असेल.