Jemimah Rodrigues Century: छोटा पॅकेट बडा धमाका अशी कामगिरी जेमिमा रॉड्रीग्जने ऑस्ट्रेलियाविरूद्ध सामन्यात केली. ऑस्ट्रेलियाविरूद्ध महिला वनडे विश्वचषक २०२५ सामन्यात शानदार शतकी खेळी केली. नवी मुंबईत खेळल्या गेलेल्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३३९ धावांच्या विक्रमी लक्ष्याला प्रत्युत्तर देताना, जेमिमाने ही शानदार खेळी केली, पण तिने या ऐतिहासिक शतकानंतरही सेलिब्रेशन मात्र केलं नाही.
जेमिमाचं एकदिवसीय कारकिर्दीतील तिसरं आणि विश्वचषक इतिहासातील हे पहिलं शतक आहे. यादरम्यान, जेमिमाने कर्णधार हरमनप्रीत कौरबरोबरी १६७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारीही केली.
गुरुवार, ३० ऑक्टोबरला नवी मुंबईत झालेल्या विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात जेमिमाने शानदार शतक झळकावले. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ३३८ धावांचा मोठा आकडा उभारला. सलामीवीर फिबी लिचफिल्डने फक्त ९५ चेंडूत ११९ धावांची खेळी केली, जी विश्वचषक इतिहासातील बाद फेरीतील सर्वात जलद शतकाचा विक्रम आहे. या मोठ्या धावसंख्येच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाला मोठ्या डावाची आवश्यकता होती. पण, दोन्ही सलामीवीरांना फक्त ५९ धावांमध्ये बाद होत माघारी परतले.
जेमिमा रॉड्रिग्जने डावाची सूत्र हाती घेतली, तिला कर्णधार हरमनप्रीत कौरकडून उत्कृष्ट साथ मिळाली. जेमिमाने आक्रमणाची सुरुवात केली आणि डावाचं नेतृत्व केलं. तिने हळूहळू डाव साकारला आणि ५७ चेंडूत तिचे अर्धशतक पूर्ण केले. कर्णधार कौरसह जेमिमाने १६७ धावांची शानदार भागीदारी करून संघाला लक्ष्याच्या जवळ आणलं.
हरमनप्रीत ८९ धावांवर बाद झाल्याने तिचं शतक हुकलं, परंतु जेमिमाने दुसऱ्या टोकाला पाय घट्ट रोवून उभी राहत ११५ चेंडूत तिचे शानदार शतक पूर्ण केलं. पण जेमिमाने या महत्त्वपूर्ण शतकानंतर सेलिब्रेशन मात्र बिलकुल केलं नाही. यामागचं कारण म्हणजे जेमिमाने कामगिरी फत्ते केली नव्हती. भारतीय संघाला अद्याप विजय मिळाला नव्हता. संघाला विजय मिळवून दिल्यानंतर जेमिमाने जमिनीवर बसत ढसाढसा रडत भारताच्या विजयाचं आणि शतकाचं सेलिब्रेशन केलं.
