Jemimah Rodrigues Reminds Sunil Gavaskar of his Promise: भारतीय महिला संघ वर्ल्ड चॅम्पियन ठरला आहे. २ नोव्हेंबरला डी वाय पाटील स्टेडियममध्ये झालेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील फायनमध्ये टीम इंडियाने ५२ धावांनी मोठा विजय मिळवला. यासह भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे. यापूर्वी सुनील गावस्करांनी भारत जर वर्ल्डकप जिंकला तर एक गोष्ट करणार असल्याचं वचन दिलं होतं. आता जेमिमा रॉड्रीग्जने व्हीडिओ शेअर करत ते वचन पूर्ण करण्यासाठी ती तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामन्यापूर्वी सुनील गावस्कर यांनी जेमिमा रॉड्रीग्जबरोबर गाणं गाण्याचं वचन दिलं होतं. सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध वादळी खेळी करणारी जेमिमा तिच्या डान्स आणि गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे. जर भारतीय महिला संघ फायनल जिंकला तर ते जेमिमाबरोबर गाणं गात या विजयाचा आनंद साजरा करायला आवडेल असं म्हणाले होते.
भारताच्या विश्वचषक विजयानंतर जेमिमा रॉड्रिग्जने क्रिकेट दिग्गज सुनील गावसकर यांना अगदी संगीतपूर्ण पद्धतीने त्यांचं वचन पूर्ण करण्याची आठवण करून दिली आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर जेमिमाने इन्स्टाग्रामवर एक मजेशीर व्हिडिओ शेअर करत लिहिलं, तुमच्याबरोबर गाणं गाण्यासाठी वाट पाहत आहे.
सुनील गावस्करांनी फायनलपूर्वी काय दिलं होतं वचन?
स्पोर्ट्स टुडेशी बोलताना सुनील गावसकर म्हणाले, “जर भारताने विश्वचषक जिंकला तर ती (जेमिमा रॉड्रीग्ज) आणि मी आम्ही दोघं गाणं गाऊ. अर्थात तिला मान्य असेल तर. तिच्याकडे तिचा गिटार असेल आणि मी तिच्यासोबत गाणं गाणार. काही वर्षांपूर्वी बीसीसीआयच्या एका कार्यक्रमात आम्ही एकत्र गाणं गायलं होतं. तिथे बँड होता आणि आम्ही त्यात सामील होण्याचा निर्णय घेतला. ती गिटार वाजवत होती आणि मी गाणं गात होतो.”
जेमिमाने शेअर केलेल्या या व्हीडिओमध्ये तिने सुनील गावस्करांना त्यांनी दिलेल्या वचनाची आठवण करून दिली. जेमिमा म्हणतेय, “हॅलो सुनील गावस्कर सर, तुम्ही म्हटलं होतं की भारतीय संघाने जर विश्वचषक जिंकला तर आपण दोघं एकत्र गाणं गाऊ. मी गिटार घेऊन रेडी आणि तुम्हीही माईक घेऊन तयार असाल. खूप सारं प्रेम आणि खूप खूप आभार.”
जेमिमाने या व्हीडिओच्या पुढे सुनील गावस्करांनी मुलाखतीत म्हटलेल्या वक्तव्याचा व्हीडिओ शेअर केला आहे आणि त्यापुढे बीसीसीआयच्या एका कार्यक्रमात गाणं गातानाचा व्हीडिओही जेमिमाने शेअर केला आहे. यामध्ये दोघांनी ‘क्या हुआ तेरा वाद’ हे गाणं गायलं होतं. आता जेमिमाच्या या व्हीडिओनंतर सुनील गावस्कर व जेमिमा एकत्र गातानाचा व्हीडिओ कधी पाहायला मिळणार, यावर सर्वांच्या नजरा आहेत.
